छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीतील युनिव्हर्सल हायस्कूलची मान्यता रद्द करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ९ नोव्हेंबर रोजी काढले आहेत. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार विहित केलेली मानके व प्रमाणके यांची पूर्तता करीत नसल्यामुळे हायस्कूलची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित युनिव्हर्सल हायस्कूलविषयी मागील दोन वर्षांपासून १६२ पालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि संचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी हायस्कूलची सविस्तर चौकशी केली. या चौकशीनंतर हायस्कूलची मान्यता रद्द करण्याचा अहवाल त्यांनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी शिक्षण संचालकांना दिला. या अहवालातून अनेक महत्त्वाच्या बाबी उघडकीस आल्या होत्या. हायस्कूलला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त नसून, आरटीईच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. असे असतानाही शाळेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान, उच्च न्यायालयातील सिव्हिल अपिल याचिकेतील आदेशाचा अवमान केला. त्याशिवाय इतरही धक्कादायक बाबींमुळे हायस्कूलची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली हाेती. या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे.
या आदेशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी समिती, विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अहवालात केलेली शिफारस व शिक्षण संचालकांच्या शिफारशीनुसार आरटीई कायदा आणि महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम २०१२ मधील तरतुदी विचारात घेऊन शाळेची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचे शासनाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचे समायोजन करायुनिव्हर्सल हायस्कूलची मान्यता रद्द करतानाच शाळेतील विद्यार्थ्यांचे विहित नियम व निकषानुसार नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात यावे, कोणत्याही परिस्थितीत या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. तसेच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि त्याचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
हायस्कूलकडून प्रतिसाद नाहीशासनाने मान्यता रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर युनिव्हर्सल हायस्कूलच्या प्राचार्या सीमा गुप्ता यांच्यासह समन्वयक कल्पेश फळसमकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मेसेजद्वारे विचारणा करण्यात आली. त्यासही प्रतिसाद मिळाला नाही.