औरंगाबाद : पक्षाघात आणि सोरायसिस आजाराने त्रस्त असलेल्या वृद्ध दाम्पत्याचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्यांचे मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी शवविछेदन अहवालात मृत्यूचे कारण राखीव ठेवले आहे. मात्र, या दाम्पत्याचा आठ ते दहा दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. विजय माधव मेहंदळे (वय ७०)आणि माधुरी विजय मेहंदळे (६५, रा. पदमपुरा, मामा चौक) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, विजय मेहेंदळे हे वाल्मीमध्ये कनिष्ठ अभियंता पदावरून बारा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांना सोरायसिसचा आजार होता, तर त्यांची पत्नी अर्धांगवायूने आजारी असल्यामुळे बेडवर पडून होत्या. विजय हेच पत्नीची शुश्रूषा करीत असत. त्यांना एक मुलगी असून, ती १६ वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहे. ती गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात औरंगाबादला आली होती. तेव्हा मेहेंदळे दाम्पत्याने त्यांचा राहता फ्लॅट मुलीच्या नावे केला होता. यानंतर मुलगी अमेरिकेला परतली. दरम्यान, येथे फ्लॅटमध्ये राहत असताना ते शक्यतो दहा-बारा दिवसांतून एकदा फ्लॅटमधून बाहेर पडत. त्यांना दूध, ब्रेड आणि औषधी लागल्यास ते त्यांच्याच कॉलनीतील औषधी दुकानदाराला फोन करून मागवून घेत. त्यांचे मोठे साडू डॉ. शरद भोगले हे त्यांना अधूनमधून कॉल करीत. त्यांनी दहा ते बारा दिवसांपूर्वी मेहंदळे यांना कॉल केला होता. त्यांच्या मुलीचेही दहा दिवसांपूर्वी वडिलांशी बोलणे झाले होते.
सोमवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे समजल्यावर सायंकाळी वेदांतनगर पोलिसांना बोलावण्यात आले. सुताराच्या मदतीने दार तोडून पोलिसांनी आत जाऊन पाहिले असता दाम्पत्य जमिनीवर मृतावस्थेत पडलेले दिसले. विजय यांचा मृतदेह कुजलेला होता, तर माधुरी यांचा मृतदेह कुजायला सुरुवात झाली होती. यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही मृतदेह घाटीत शवविछेदन करण्यासाठी हलविले. मंगळवारी त्यांचे शवविछेदन करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे कारण डॉक्टरांना स्पष्ट झाले नाही. यामुळे त्यांचा व्हिसेरा राखीव ठेवून मृत्यूचे कारण राखीव ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शंकर डुकरे तपास करीत आहेत.
पोलिसांनी केले अंत्यसंस्कारमृत मेहेंदळे यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या जवळचे एकही नातेवाईक नव्हते. मुलीने अमेरिकेहून येणे शक्य नसल्याचे पोलिसांना सांगितले. मोठे साडू असलेल्या वयोवृद्ध डॉ. भोगले यांनी कोरोनामुळे अंत्यसंस्कार करण्यास असमर्थता दर्शविल्याने पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.