लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या स्वच्छतागृहाजवळ नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे मृत अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आले. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास निदर्शनास आली.प्राप्त माहिती अशी की, घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाजवळच शौचालय आहे. या शौचालयाजवळच अंधारात कोणीतरी नवजात अर्भकाला फेकून दिले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नागरिकांना हे अर्भक नजरेस पडल्याने त्यांनी या घटनेची माहिती सुरक्षारक्षक आणि बेगमपुरा पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या अर्भकास ताब्यात घेतले आणि अपघात विभागात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्या अर्भकाला तपासून मृत घोषित केले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे अर्भक आजच जन्मलेले असावे. त्या अर्भकाचा मृत्यू कशामुळे झाला, हे मात्र समजू शकले नाही. मंगळवारी त्या अर्भकाचे शवविच्छेदन केल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांकडून अज्ञात मातेविरोधात गुन्हा नोंद केला जाणार आहे.या अर्भकाच्या माता-पित्याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. घाटी रुग्णालयात रोज सरासरी ६० ते ७० प्रसूती होतात. यामुळे घाटीत जन्मलेले हे बाळ आहे, अथवा अन्य ठिकाणचे, याबाबतचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.