संतोष वाघ, चितेगावचितेगाव-इमामपूर या रस्त्यावरील तीन पुलांचे बांधकाम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. हे काम पूर्णत्वास नेण्याची मुदत मार्च २०१४ ची होती. मुदत संपूण सहा महिने झाले तरीही काम अर्धवटच आहे. पुलांचे काम संथ गतीने चालू असल्याने या रस्त्यावरील सर्व गावांच्या नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले असून पावसाळ्यात तर गावाबाहेर पडणे मुश्कील होते. राज्य रस्ता क्रमांक ३० पासून चितेगाव ते इमामपूर या १० कि़मी. रस्त्यावरील नदीवर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन पूल बांधकाम व पाच वर्षे देशभालीसाठी मार्च २०१३ मध्ये एक कोटी ८५ लाख रुपये मंजूर होऊन काम सुरू झाले. हे काम मार्च २०१४ मध्ये पूर्ण करण्याची अट असूनही या तीन पुलांची कामे अजून ५० टक्केही झालेले नाही. चितेगाव ते बाभूळगाव शिवारातील दोन पुलांचे काम हे १ कोटी ३० लाख रुपये मनीषा कन्स्ट्रक्शन यांनी घेतले असून या पुलाचे काम मध्यंतरी अनेकवेळा बंद ठेवले. जुना पूल हटविल्यानंतर नदीवर तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ताही पुरामुळे वाहून गेल्याने या ठिकाणाहून आपली वाहने ने-आण करणे मुश्कील झाले आहे. या रस्त्यावरील नद्यांना पूर आला तर बाभूळगाव, इमामपूर, पैठणखेडा, जयतपूर, केसापुरी, वाकी या गावाचा अन्य गावांशी संपर्क तुटतो. या गावांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी बिडकीन, चितेगाव व औरंगाबाद या ठिकाणी ये-जा करावी लागते; परंतु रस्ताच नसल्याने खूप दूरवरून पायी येणे अवघड होत आहे. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला जनावरांना टाकावा लागत आहे. पुढे हा रस्ता वाळूज औद्योगिक वसाहतीला मिळतो. नदीला पाणी आल्याने अनेक कामगारांच्या रोजंदारीवर गदा येत आहे. याविषयी या गावांतील अनेक नागरिकांनी संबंधित ठेकेदाराकडे कामाविषयी तक्रार केली. या पुलाच्या बांधकामाचा कालावधी उलटला असून संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वरील गावांच्या नागरिकांनी केली आहे.
‘डेडलाईन’ मार्चची; काम अजूनही अर्धवट
By admin | Published: September 07, 2014 12:48 AM