औरंगाबाद : औरंगाबादहून नांदेड मनमाड किंवा सिकंदराबाद किंवा अन्य ठिकाणासाठी सध्या एकही पॅसेंजर रेल्वे धावत नाही. सध्या ज्या विशेष रेल्वे धावत आहेत, त्या सर्वच एक्स्प्रेस आहेत. त्यातही आरक्षित तिकीटधारकांनाच प्रवेश दिला जातो. पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीब रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. पैसे वाचविण्यासाठी रस्ते मार्गाने जीवघेणा प्रवास करण्याचीही वेळ प्रवाशांवर ओढवत आहे.
कोरोनामुळे रेल्वेची वाहतूक बंद केली होती. जूनपासून सचखंड एक्स्प्रेस सुरु झाली आणि त्यानंतर विशेष रेल्वे म्हणून अन्य ७ रेल्वेही सुरू करण्यात आल्या. रोटेगाव, तारूर, परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूळ, बदनापूर, जालना आदी ठिकाणांहून औरंगाबादला रोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु पॅसेंजरच नसल्याने या प्रवाशांची गैरसोय होत आहे. गरीबांच्या सोयीची रेल्वे सुरु करण्याकडे राज्य आणि केंद्र सरकारही फारसे गंभीर नसल्याचे दिसत आहे. पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने गरीबांना मोठा आर्थिक फटकाही बसत आहे. हिवाळ्याच्या दिवसात कडाक्याची थंडी असताना अनेकजण लांबच्या पल्ल्याचा प्रवासही दुचाकीवर करत असल्याचे चित्र दिसते.
नगरसोल-नांदेड पॅसेंजर बंदनगरसोल-नांदेड पॅसेंजर, जालना-नगरसोल डेमू, निजामाबाद-पुणे, पुणे- निजामाबाद, दौंड-नांदेड, मनमाड-काचीगुडा, काचीगुडा-मनमाड या पॅसेंजर सध्या बंद आहेत. यात निजामाबाद-पुणे,दौंड-नांदेड, मनमाड-काचीगुडा जेव्हा सुरू होतील, तेव्हा एक्स्प्रेस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कायम राहण्याची स्थिती आहे.
रस्ते मार्गाने जीवघेणा प्रवासरोज नोकरी, व्यवसाय, काम, शिक्षण, उपचारासाठी ये-जा करणाऱ्यांना रस्तेमार्गाने ये-जा करावी लागत आहे. पैसे वाचविण्यासाठी दुचाकीवरून ट्रिपल सिट प्रवास केला जातो. प्रवाशांची ही जीवघेणी कसरत थांबण्यासाठी पॅसेंजर सुरू होणे गरजेचे आहे.-संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष रेल्वे प्रवासी सेना
सचखंड, देवगिरी, नंदीग्राम एक्स्प्रेस सुरूऔरंगाबादहून सध्या सचखंड, देवगिरी, नंदीग्राम, राज्यराणी, अजिंठा एक्स्प्रेस, नरसापूर-नगरसोल, काकीनाडा- शिर्डी एक्स्प्रेस धावत आहे. तसेच कोरोनापूर्वी पॅसेंजर असलेली औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर ही रेल्वे आता एक्स्प्रेस म्हणून धावत आहे.
प्रवाशांची होतेय परवडलासूरहून औरंगाबादला पॅसेंजरने येण्यासाठी केवळ १० रुपये लागतात. परंतु, पॅसेंजरच बंद असल्याने एसटीने, दुचाकीने ये-जा करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यासाठी ६० ते ७० रुपये खर्च होतात. यातून गोरगरीब प्रवाशांची परवड होत आहे.