लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव/ औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला आहे. सेनगाव जयपूर येथे १३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शंकर पांडुरंग पायघन (२३) या युवकाचा विजेचा जबर धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या गलथानपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जयपूर येथील शंकर पांडुरंग पायघन (२३) हा युवक गावातील सर्व्हिसिंग सेंटरवर गेला होता. यावेळी नवीन सर्व्हिसिंग मशीनची मित्रासमवेत हाताळणी करीत असताना अचानक पाईपमध्ये विजेचा प्रवाह उतरून पायघन यांना जबर धक्का लागला. घटनास्थळापासून १० मीटर अंतरावर डीपी असताना तिला फ्यूज नसल्याने वीजप्रवाह बंद करता आला नाही. या दुर्देवी घटनेत पायघन यांचा मृत्यू झाला. त्यांना रिसोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.दुसऱ्या घटनेत औंढा तालुक्यातील काळापाणीतांडा येथील शेतकरी गेला असता खाली पडलेल्या विजेचा तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली आहे. काळापाणी तांडा येथील अनिल नामदेव पवार (२७) हा शेतामध्ये गेला असता पिकामध्ये आलेली शेळी हाकलण्यासाठी तिच्यामागे धावत असताना रात्रीच्या वेळी तुटलेल्या विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.रोहिदास राठोड व रामदास पवार ही माहिती दिल्याने कुरूंदा पोलिसांत याची नोंद केली आहे. गुरूवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळाचा वीज वितरणीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. जि.प. सदस्या सुमन रमेश जाधव यांनी वीज वितरण कंपनीने सदरील मयतास नुकसान भरपाई करून देण्याची मागणी केली आहे.
विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
By admin | Published: July 15, 2017 12:11 AM