लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील इंदेवाडी शिवारात रविवारी पहाटे एका हरणाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. याच परिसरात काही दिवसांपूर्वी २४ गायींचा मृत्यू झाला होता.यात हरणाचाही मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिका-यांना दिली. उत्तर वनपरिक्षेत्र विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निकुंभ यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी पंचनामा केला. मादी जातीच्या या हरणाला वनविभागाच्या अधिका-यांनी उत्तरीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर या हरणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे निकुंभ यांनी सांगितले. दरम्यान पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुपारी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.यावेळी सरपंच शिवनाथ काळे यांनी सांगितले की, गावातील उर्वरित १२ गायींना, अशा प्रकारचा दगा होऊ नये म्हणून उर्वरित गायींना गो शाळेत पाठविण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यानंतर पालकमंत्री लोणीकर यांनी पांजरापोळ गोशाळेचे घनशाम गोयल यांच्याशी संपर्क साधला. ग्रामपंचायत ठराव घेऊन उर्वरित गायी गोशाळेत दाखल करून घेण्याची व्यवस्था केली. या प्रकरणाचा तपास जलद करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही लोणीकरांनी ग्रामस्थांना दिली. ज्या शिवारात मृत गायी आढळून आल्या, तेथील चाºयाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवा, अशा सूचना त्यांनी केल्या.
इंदेवाडीत हरणाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:24 AM