औरंगाबाद : घाटी येथे चारचाकी वाहन रिव्हर्स घेताना एका वृद्ध महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना १८ एप्रिल रोजी सकाळी घडली होती. या प्रकरणात घाटीच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राधाबाई साळवे (७५, रा. चिकलठाणा) या उपचारासाठी १८ एप्रिल रोजी सकाळी घाटीत आल्या होत्या. थकल्याने त्या ओपीडीसमोरील चारचाकी वाहनतळ भागात बसल्या होत्या. सकाळी साडेनऊ वाजता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश खरात हे आपली कार रिव्हर्स घेऊन लावत होते. त्यावेळी पाठीमागे बसलेल्या राधाबाई त्यांना दिसून आल्या नाही. त्यांनी वाहन राधाबाईच्या अंगावर घातले. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना राधाबाईचा मृत्यू झाला.
चौकशीनंतर गुन्हा दाखलयाप्रकरणी मयत राधाबाईचा नातू अरुण प्रकाश साळवे यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर निष्काळजीपणे गाडी चालवून वृद्ध आजीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. राजेश खरात यांच्याविरोधात शुक्रवारी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक देवकते पुढील तपास करीत आहेत.----------