लाडसावंगी : आडगाव सरक येथील शेतकरी रुस्तुम माणिकराव पठाडे (५२) यांचा शुक्रवारी घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २७ डिसेंबर रोजी शेतात विजेच्या खांबाला चिकटल्याने ते गंभीर भाजले होते. तसेच त्यांचा एक हात कापावा लागला होता. मृत्यूनंतर नातेवाइकांनी संबंधित विभागावर आरोप करीत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत नातेवाइकांची समजूत काढली.
आडगाव सरक येथील रुस्तुम माणिकराव पठाडे हे २७ डिसेंबर रोजी बकऱ्यांना घेऊन शेतात गेले होते. यावेळी ११ के.व्ही. वीज वाहून नेणाऱ्या विद्युत पोलमध्ये वीजप्रवाह उतरलेला होता. त्या पोलला चिकटल्याने ते गंभीररित्या भाजले होते. त्यांना नातेवाइकांनी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यात त्यांचा डाव हात निकामी झाला होता.
तेरा दिवसांपासून उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांनी श्वास सोडला. यावेळी नातेवाइकांनी महावितरणच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना निलंबित करण्याची मागणी केली. तोपर्यंत मृतदेह घेणार नाही अशी भूमिका स्वीकारली. पोलिसांनी विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व ग्रामीण लाईनमन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. नोेकरीसंदर्भात आश्वासित केले. तातडीने वीस हजारांची मदत केली. अखेर शनिवारी रुस्तुम पठाडे यांच्यावर आडगाव सरक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
..........................