औरंगाबाद : हिमायतबाग चौकातील पॅसफिक रुग्णालयाचे संचालक तथा प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. इस्तियाक अन्सारी यांच्या पाचवर्षीय रय्यान अन्सारी या चिमुकल्याला बुधवारी रात्री ८ वाजता कूलरचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी ‘फजर’च्या नमाजनंतर चिमुकल्या रय्यानचा दफनविधी होणार आहे.
हिमायतबाग परिसरातील सत्यविष्णू हॉस्पिटलजवळ डॉ. इस्तियाक अन्सारी राहतात. त्यांच्या पत्नी नायला यासुद्धा डॉक्टर आहेत. दोघे पती-पत्नी बुधवारी सायंकाळी घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेहमीप्रमाणे रुग्णांना सेवा देत होते. घरात अन्सारी दाम्पत्याची मोठी मुलगी, मुलगा रय्यान दोघेच होते. सायंकाळी घरकाम करण्यासाठी आलेली कामवाली बाई होती. रय्यान कधीच घरात स्वस्थ बसत नव्हता. बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास कूलरचे बटण बंद करण्यासाठी तो सरकावला. त्याचा एक हात पाण्यात होता. यावेळी कूलरमध्ये अगोदरच वीज प्रवाह संचारलेला होता. याची जाणीव निष्पाप रय्यानला नव्हती. त्याने बटणला हात लावताच त्याला जोराचा शॉक लागला. दुसऱ्याक्षणी रय्यान कूलरपासून फेकला गेला. त्याच्या मोठ्या बहिणीने आरडाओरड सुरू केली. रय्यानचे काका धावत आले. त्याचवेळी आई-वडीलही पोहोचले. त्याला त्वरित पॅसफिक रुग्णालयात नेण्यात आले.
चिमुकल्याचा जीव वाचविण्याचे सर्व प्रयत्न आई-वडिलांनी केले; पण त्यांना शेवटपर्यंत यश आले नाही. रात्री उशिरा रय्यान अन्सारीच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर पोहोचले. या घटनेनंतर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. न्यूरोसर्जन डॉ. इस्तियाक यांना ओळखणारा, मित्रपरिवार मोठा असल्याने त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी धाव घेतली. गुरुवारी सकाळी रोजाबाग येथील औलिया मशीदमध्ये ‘फजर’च्या नमाजनंतर नमाज-ए-जनाजा पढण्यात येणार आहे. मौलाना आझाद महाविद्यालयासमोरील कब्रस्तानात दफनविधी करण्यात येत आहे.
रोजाही ठेवला होता...अवघ्या पाचव्या वर्षी रय्यान अन्सारीने हट्ट करून अलीकडेच ‘रोजा’ही ठेवला होता. त्याच्या आयुष्यातील हा पहिलाच रोजा असल्याने डॉ. इस्तियाक यांच्या कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात रय्यानची ‘रोजारख्खी’साजरी केली होती. याच रमजान महिन्यात रय्यान सर्वांना सोडून जाईल, असे कोणाच्या स्वप्नातही आले नव्हते.