जालना : शहरातील मंठा नाक्यावरील म्हाडा कॉलनीत धूलिवंदनाच्या दिवशी गॅस गळती करुन भाजलेल्या सहापैकी गंभीर जखमी असलेला विजय कांगणे याचा गुरूवारी सकाळी ९.४५ वाजता औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने या प्रकरणातील मृत्यूची संख्या आता चार झाली आहे. उर्वरित दोघांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.शहरातील म्हाडा कॉलनीत संदीप कांगणे यांनी आपल्या घरी होळीनिमित्त जेवणाचे आयोजन केले होते. परंतु संदीप कांगणे याने जाणीवपूर्वक सिलिंडरची नळी हवेत मोकळी सोडून गॅस गळती करीत तिघांच्या मुत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संदीप कांगणे याच्यावर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ मार्च रोजी किरकोळ घरगुती वादातून संदीप कांगणे याने स्वत:ला स्वयंपाकगृहात कोंडून घेत गॅस गळती केली. दरम्यान, मध्यस्थी करण्यास गेलेल्या शेजाऱ्यांसह मेव्हणाही यात गंभीररित्या भाजला होता.सहाही जखमींना औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. होळीसणानिमित्त संदीप कांगणे यांच्या घरी दुपारी १ ते २ घरी मेजवाणीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु संदीप कांगणे आणि त्याची पत्नी यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मेजवाणी असल्याने संदीप याने मद्य प्राशन केले होते. पत्नीशी वाद झाल्याने संदीप याने गॅसची नळी काढून टाकली आणि स्वयंपाक घराचा आतून दरवाजा बंद केला. त्याचवेळी कुटुंबियांनी व शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत स्वयंपाक घराचा दरवाजा तोडला आणि आगीचे लोळ अंगावर उडाले. यात सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, मंगळवारी सूर्यकांत महामुनी, राधाबाई कांगणे, गणेश वाघ यांचा मृत्यू झाला. तर ९६ टक्के भाजलेला विजय कांगणे याचा गुरूवारी सकाळी ९.४५ मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला. सध्या ७० टक्के भाजलेला संदीप कांगणे आणि ८० टक्के गंभीर जखमी झालेला संदीप डिघोळे यांची अद्याप मृत्यूशी झुंज सुरुच आहे.जालना शहरातील गॅस गळती व स्फोट प्रकरणातील आठव्या दिवशी गंभीर जखमी असलेल्या विजय कांगणे (२८) याचा गुरूवारी सकाळी ९.४५ वाजता औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला. महिनाभरापूर्वीच विवाह झालेल्या विजयचा मृत्यू झाल्याने अर्ध्यावरती डाव मोडल्याची भावना त्याच्या मित्रांनी व्यक्त केली. १३ फेब्रुवारी २०१६ विजयचा विवाह झाला होता. विवाहाला जेमतेम चाळीस दिवसच झाले. भावी जीवनाचे स्वप्न रंगवत असतानाच नव्यानेच कंपनीत नोकरी लागल्याने तो खूश होता. आणि त्याने औरंगाबाद येथे घरही खरेदी केले होते. परंतु २४ मार्चची पहाट उगवली ती संकट घेऊनच. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण स्पप्नांचा चुराडा झाल्याची भावना त्याच्या मित्रांनी व्यक्त केली. त्याची पत्नीही एम.टेक. करत आहे. सध्या विजय जालना औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. वरिष्ठ पदावर असूनही विजयने कधीच गर्व केला नसल्याचे त्याचे मित्र सचिन काकडे, मोहन कोकाटे म्हणाले. धूलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या घटनेत सर्वांना घरातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात विजय ९६ टक्के भाजला गेला. पती-पत्नीच्या भांडणातून घडलेल्या या घटनेत सहाजण गंभीर भाजले. त्यात तीन दिवसांपूर्वीच सूर्यकांत महामुनी, राधाबाई कांगणे, गणेश वाघ यांचा मृत्यू झाला. तर ९६ टक्के भाजलेला विजय कांगणे याचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला.
‘त्या’ गॅसगळती प्रकरणातील चौथ्या जखमीचा मृत्यू
By admin | Published: April 01, 2016 12:41 AM