- संतोष हिरेमठऔरंगाबाद : अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर घर होते; पण रात्रीच्या अंधारात काळ आला होता. काही कळण्याच्या आत जोरदार आवाज करीत गाडी धडकली. पण काही तरी पुण्य केले म्हणून पती, सात वर्षांचा मुलगा आणि मी असे तिघेही बचावलो, अशी भावना सिल्लोड - भराडी रस्त्यावर मोढा फाट्यावरील अपघातात सुखरूप राहिलेल्या ज्योती आजिनाथ खेळवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
अपघातात जखमी झालेले आजिनाथ खेळवणे (४५) आणि त्यांचा मुलगा गणराज (७) या दोघांवर घाटीत एकाच खाटेवर उपचार करण्यात आले, तर ज्योती खेळवणे यांना अपघातात मुक्का मार लागला. उपचार घेणाऱ्या पती आणि मुलाच्या शेजारी बसून होत्या. अपघाताविषयी सांगताना सगळी घटना जणू त्यांच्या डोळ्यापुढे उभी राहात होती. त्या म्हणाल्या, रात्रीचे दीड-दोन वाजले होते. काही वेळातच घरी पोहोचणार होतो. त्यामुळे जागे होतो. पती, मुलगा आणि मी गाडीत सगळ्यात मागे बसलाे होतो. काही लक्षात येण्याआधीच जोरदार आवाज होऊन गाडी दुसऱ्या वाहनाला धडकली. सर्वजण एकमेकांवर पडलो. मला फार काही लागले नाही. पतीला, मुलाला मार लागला. नेमके काय झाले हे अजूनही कळेनासे झाले आहे, असे ज्योती खेळवणे म्हणाल्या.
यांच्यावरही उपचार सुरूया अपघातात जखमी झालेल्या धुलाबाई बोर्डे (६०), सुलोचना खेळवणे (६०) आणि दुर्गाबाई खेळवणे (४५) यांच्यावर घाटीतील वाॅर्ड क्रमांक-२१ मध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाइकांनी घाटीत धाव घेतली.
वऱ्हाडावर काळाचा घाला ! भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळून ६ वऱ्हाडी जागीच ठार,१४ जखमी