औरंगाबाद : घराच्या पहिल्या मजल्यावरील झाडाला नळीने पाणी देत असताना गॅलरीला लागून गेलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे शॉक लागलेल्या सुनेला वाचविण्याच्या प्रयत्नात सासऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उस्मानपुरा येथील सहकारनगरात घडली.जयराज अण्णासाहेब पाथ्रीकर (६४, रा. सहकारनगर), असे मृताचे नाव आहे, तर त्यांची सून कोमल अभिजित पाथ्रीकर (३२) या घटनेत गंभीररीत्या होरपळल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, पाथ्रीकर हे विमा कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी होते. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कोमल या नेहमीप्रमाणे घराच्या पहिल्या मजल्यावरील कुं ड्यांतील झाडांना नळीने पाणी देत होत्या. त्यांच्या घराच्या गॅलरीजवळूनच महावितरणची उच्चदाब वाहिनी गेलेली आहे. झाडाला पाणी देताना नळीत वीज प्रवाह संचारल्याने कोमल यांना शॉक लागल्याने त्या जोराने ओरडल्या. आतल्या खोलीतून जयराज हे कोमल यांना वाचविण्यासाठी गॅलरीत आले आणि त्यांनी कोमल यांच्या हातातील पाण्याचा पाईप खेचून घेतल्याने स्फोटासारखा आवाज होऊन जयराज आणि कोमल यांना जोराचा शॉक लागून ते गंभीररीत्या जळाले. त्यांना बेशुद्धावस्थेत जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी जयराज यांना तपासून मृत घोषित केले. कोमल यांच्या दोन्ही हातांना होरपळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच जयराज यांच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी त्यांच्या निवासस्थानी आणि घाटी रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शॉक लागल्याने सासऱ्याचा मृत्यू, सूनही गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:25 PM
घराच्या पहिल्या मजल्यावरील झाडाला नळीने पाणी देत असताना गॅलरीला लागून गेलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे शॉक लागलेल्या सुनेला वाचविण्याच्या प्रयत्नात सासऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उस्मानपुरा येथील सहकारनगरात घडली.
ठळक मुद्देसहकारनगरातील घटना :