लोकमत न्यूज नेटवर्ककुंभारपिंपळगाव : माहेरी असलेल्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीचा सास-यासोबत वाद झाला. वाद वाढत गेल्याने सासरा, मेहुणा आणि जावयामध्ये हाणामारी झाली. यात गंभीर जखमी झालेल्या जावयाचा मृत्यू झाला. घनसावंगी तालुक्यातील अरगडेगव्हाण येथे रविवारी सकाळी ही घटना घडली.कुंभारपिंपळगाव येथील खंडू सर्जेराव लोंढे (३६) हे सकाळी पत्नी रेखा हिला आणण्यासाठी अरगडेगव्हाण येथे सासरी गेले होते. या वेळी खंडू लोंढे यांचा सासरा काळू थोरात व मेव्हणा वसंत थोरात यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला तिघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात गंभीर जखमी झालेल्या खंडू लोंढे यांना सुरुवातीला कुंभारपिंपळगाव येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जालन्याला नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.घटनेनंतर मृत लोंढे यांची पत्नीसह सासू, सासरा, मेहुणा, मेहुणी फरार झाले आहेत.घटनेनंतर उशिरा उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने, घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, सहायक निरीक्षक टी. टी. धूमाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी लोंढे यांच्या नातेवाइकांनी पोलीस चौकीत गर्दी केली होती. या प्रकरणी रात्री उशिरा सर्जेराव लोंढे यांच्या फिर्यादीवरुन संशयित सासरा व मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सास-याच्या मारहाणीत जावयाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:46 AM