औरंगाबाद : औरंगाबाद येथील एका रुग्णालयातुन आपल्या मुलावर उपचार करून गावाकडे परत निघालेल्या दाम्पत्याची दुचाकी पिकअप वाहनाला पाठीमागुन जोरदार धडकली. यावेळी दुचाकीवर समोर बसलेल्या एका ६ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज ( दि ४ रोजी ) दुपारी एक वाजेच्या सुमारास पिंपळगाव पांढरी शिवारात घडली.
शेख अमान शेख शौकत ( ६,रा. रांजणगांव दांडगा ता पैठण ) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. तर शेख शौकत उर्फ कठठू शेख लाल ( २८ ) व शेख नसरीन शेख शौकत (२३) हे दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.करमाड पोलिसांनी सांगितले की पैठण तालुक्यातील रांजणगांव दांडगा येथील दांपत्य आज सकाळी आपला मुलगा अमान हा आजारी असल्याने त्याला औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याच्यावर उपचार करून परत दुपारी आडूळ मार्गे रांजणगांव दांडगा येथे आपल्या घरी हे पती पत्नी व त्यांचा मुलगा असे तिघे जण दुचाकीवर ( क्रमांक एम एच २०,सी ई - ५३२२) परतत असतांना पिंपळगाव पांढरी शिवारात त्यांची दुचाकी औरंगाबादहुन आडूळकडे जात असलेल्या पिकअप वाहनाला ( एम एच २१,एक्स ५१२०) पाठीमागून जोरदार धडकली. यावेळी दुचाकीवर समोर बसलेला अमान जागीच ठार झाला. तर त्याचे आई - वडील गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या पत्नी पत्नीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
शेख अमान हा रांजणगांव दांडगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ लिच्या वर्गात शिकत होता.त्याला दोन मोठ्या बहिणी असून आई वडिलांना तो एकुलता एक होता.त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या राष्ट्रीय महामार्गावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रांजणगांव दांडगा येथील ग्रामस्थांनी लावून धरल्याने याठिकाणी काही वेळापर्यंत तणाव निर्माण झाला होता.