पैठण (औरंगाबाद ) : गोदावरी पात्रात पोहताना वाहून गेलेल्या दोन पैक्की एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १७) दुपारी घडली. स्थानिकांना एकास वाचविण्यात यश आले आहे. फैसल फिरोज शेख (१६, रा. पॉवर हाऊस, पैठण ) असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. मृतदेहाचा शोध गोदावरी पात्रात घेण्यात येत असून अद्यापपर्यंत मृतदेह हाती लागला नव्हता.
जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात ५७८२ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू असल्याने पैठण परिसरात गोदावरी नदी दुथडी भरून वहात आहे. दरम्यान आज दुपारी शहरातील पॉवर हाऊस भागात राहणारे दोघे मुले शनी मंदिराच्या पाठीमागील गोदावरी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे या दोघांनाही साधारण पोहता येत होते. गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने पाण्यात उडी मारताच ते वाहू लागले. स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच नागरीकांनी गोदापात्रात उड्या मारून दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी फैसल फिरोज शेख (१६) यास वाचविण्यात अपयश आले.
खबर मिळताच पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख व कर्मचारी पथकाने घटनास्थळी जाऊन प्रवाहात वाहून गेलेल्या फैसल फिरोज शेखचा शोध सुरू केला. सदरील घटनेने नेहरू चौक, पॉवर हाऊस परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.