वाळूज महानगर (औरंगाबाद ) : पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून खाजगी अकॅडमीमार्फत सरावासाठी मैदानात गेलेल्या पंढरपुरातील १८ वर्षीय तरुणीचा सरावादरम्यान चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सिडको वाळूजमहानगरात घडली. सीमा भगवान बोकनकर असे मृत तरुणीचे नाव आहे.
सीमा बोकनकर (१८ रा.पोलीस कॉलनी, पंढरपूर) ही नुकतीच ७२ टक्के गुणांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तिचे वडील दिव्यांग असून, आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. तिने बुधवारी बजाजनगरातील रेसलक्ष्य अॅकडमीचे संचालक शिवाजी पा.बनकर यांची भेट घेऊन प्रवेश देण्याची विनंती केली. हलाखीची परिस्थिती असल्याने पैसे नसल्याचे सांगितले. बनकर यांनी तिला अॅकडमीत मोफत प्रवेश दिला. दरम्यान, गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सिमाची आई छायाबाई यांनी तिला रेसलक्ष्य अॅकडमीत नेऊन सोडले होते. अॅकडमीतील इतर मुलींसोबत सिमा सिडको वाळूजमहानगरात मोकळ्या मैदानावर सरावासाठी गेली होती.
सरावादरम्यान सकाळी ६ वाजेच्या सुमारास सीमा भोवळ आल्याने मैदानावर कोसळली. हा प्रकार लक्षात येताच इतर मुलींनी या घटनेची माहिती प्रशिक्षक व सिमाच्या नातेवाईकांना दिली. तिला बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, या रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्याने नातेवाईकांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे सकाळी ८ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दुपारी ३.३० वाजेच्या तिच्यावर पंढरपुरातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.