सुमित डोळे/छत्रपती संभाजीनगर : राज्यभर गाजत असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या सामन्यात पंचाची भूमिका बजावणारे शहरातील नितीश काबलीये (रा. बेगमपुरा) यांना आता जिवे मारण्याच्या धमक्या आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रकार वाढत चालल्याने त्यांनी बेगमपुरा पोलिसांकडेपोलिस संरक्षण देण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे.
रविवारी अहिल्यानगरच्या वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी किताबासाठी पृथ्वीराज मोहोळ व महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढतीत मोहोळ विजेता ठरला. मात्र, पंचाच्या या निर्णयावरून मोठा वाद उफाळून आला. स्पर्धक महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे यांनी पंचासोबत हुज्जत घातली. उपांत्य सामन्यात राक्षेने पंचांना लाथ मारत शिवीगाळ केली, तर गायकवाडने देखील वाद घालून शिवीगाळ केली. परिणामी, महाराष्ट्र कुस्ती परिषदेने दोघांवर तीन वर्षांसाठी बंदी घातल्याचे जाहीर केले.
महाराष्ट्र कुस्ती परिषदेने पंचांच्या निर्णयाची पाठराखण केली. मात्र, सोशल मीडियाद्वारे पंचांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी सुरू झाली. अंतिम सामन्यात पंच राहिलेले शहरातील कुस्तीपटू नितीश काबलिये यांना थेट जिवे मारण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे त्यांनी तत्काळ पोलिसांकडे याबाबत तक्रार देत पोलिस संरक्षणाची मागणी केली. काबलिये यांचा अर्ज वरिष्ठांकडे पाठवला जाईल. तेथे निर्णय हाेईल, असे बेगमपुऱ्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी स्पष्ट केले.