औरंगाबाद : अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टर चे समोरील चाक गेल्याने चिमुकल्याचा जागीच अंत झाल्याची घटना आज शनिवारी (दि. १८ ) सकाळी १०. ३० वाजेच्या सुमारास जुना भावसिंगपुरा परिसरातील वीटभट्टी वर घडली. चेतन सुनील मोरे (वय 3 वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव असून या घटनेनंतर छावणी पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार मुळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी अनिल मोरे हे वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. गेल्या काही महिन्यापासून ते पत्नी आणि मुलासह तेथेच पत्र्याच्या खोलीत राहतात. आज सकाळी ९.३० ते १० वाजेच्या सुमारास चिमुकल्याची आई घरातील काम करीत होती. तर वडील सुनील हे अंघोळ करीत होते. चेतन घरासमोरील अंगणात खेळत होता.
यावेळी ठिकाणी वीटभट्टीवर आलेला एक ट्रॅकटर उभा होता. चालक मुनिर खान इमाम खान (35, रा .किराडपुरा) हा बाजूलाच मित्रासह बोलत उभा होता. काही वेळाने चालक मुनिर आणि मित्र ट्रॅक्टरवर बसले. गप्पांच्या ओघातच मुनीरने ट्रॅक्टर सुरू केले . यावेळी ट्रॅक्टर समोर खेळणाऱ्या चेतनच्या अंगावरुन वरून ट्रॅक्टरचे समोरील चाक गेले आणि मागील चाक डोक्यावरून गेल्यामुळे त्यामागील अवघ्या काही सेकंदात चेतन चिरडून ठार झाला.
चालक आणि मित्र दोघे बोलण्यात एवढे मग्न होते की ट्रॅक्टरखाली चिमुकला आल्याचे भान ही त्यांना नव्हते. यावेळी घराबाहेर आलेल्या चेतनच्या आई-वडिलांनी हे दृश्य पाहून हंबरडा फोडल्यानंतर काही अंतरावर चालकाने ट्रॅक्टर थांबविले. गंभीर जखमी आणि बेशुद्ध चेतनला आई वडील व भट्टीवरील कामगारांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरानी चेतनला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅक्टर आणि चालक मुनिरला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे मोरे कुटुंब सहा महिन्यानंतर आज मूळगावी परत जाणार होते.