औरंगाबाद: लहान भावासोबत ओढणीने खेळत असताना गळफास लागल्याने बारा वर्षीय चिमुकल्याचा अंत झाल्याची घटना, उस्मानपुरा परिसरातील नागसेननगरमध्ये गुरूवारी दुपारी घडली. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आरमान अजीम कुरेशी(वय १२,रा. नागसेननगर, उस्मानुपरा)असे मृत बालकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, आरमानचे वडिल हे मुंबईत पेंटर म्हणून कामाला गेले आहेत. तर त्याची आई धुणी-भांडी करून घरसंसाराला आर्थिक हातभार लावते. आरमानला एक बहिण आणि आठ वर्षाचा लहान भाऊ आहे. गुरूवार दुपारी आरमानची आई कामावर गेली होती, यामुळे आरमान ,त्याची बहिण आणि लहान भाऊ घरी होते. आरमान लहान भावासोबत ओढणीशी खेळत होता.
दुपारी दोन अडिच वाजेच्या सुमारास आरमानला अचानक ओढणीचा गळफास लागल्याने तो बेशुद्ध पडला. बराचवेळ झाल्यानंतरही आरमान कोणतीही हालचाल करीत नसल्याने त्याच्या भावाने ही बाब घरात खेळत असलेल्या बहिणीला सांगितली. त्याचवेळी चिमुकल्यांची आई कामावरून घरी आली. तेव्हा त्यांना आरमान हा बेशुद्धावस्थेत पडलेला दिसला. त्यांनी रिक्षातून आरमानला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास आरमानचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि कर्मचाऱ्यांनी याविषयी उस्मानपुरा ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा केला. शुक्रवारी सकाळी आरमानचे घाटीत शवविच्छेदन करण्यात आले. यात आरमानचा मृत्यू गळा दबल्या गेल्याने झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.