लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अपघातात मित्राचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर तातडीने दुचाकीने औरंगाबादकडे येणाºया तरुणाचाही अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पडेगाव येथील हनुमान मंदिरासमोर मंगळवारी रात्री ही घटना घडली. वेगवेगळ्या अपघातात दोन जिवलग मित्रांचा अंत झाल्याने बोरसर गावावर शोककळा पसरली.प्रवीण गोटुराम पवार ( २५, रा. बोरसर, गल्लेबोरगाव) आणि प्रदीप आनंद रंधे (२१), अशी दुर्दैवी मित्रांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, प्रवीण आणि प्रदीप हे जिवलग मित्र. प्रवीण आणि अमोल घुमे हे मंगळवारी सायंकाळी कामानिमित्त गल्लेबोरगाव येथे दुचाकीने गेले होते. बोरगाव येथून ते गावी परत जात असताना त्यांना बोरगाव टाकळी येथे भरधाव येणाºया पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये प्रवीण आणि अमोल जखमी झाले. या अपघातात प्रवीण गंभीर जखमी झाल्याने त्यास औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना प्रवीणचा मृत्यू झाला. ही बाब प्रदीपला कळल्याने तो रात्री उशिरा दुचाकीने मित्राला पाहण्यासाठी औरंगाबादच्या दिशेने येऊ लागला. पडेगावजवळील हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात प्रदीप गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. पडेगाव येथील नागरिकांनी त्यास तातडीने घाटी रुग्णालयात हलविले; मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी प्रदीप यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ या घटनेचा तपास करीत आहेत.
गावावर शोककळाएकाच दिवशी बोरसर येथील दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने गावातील वातावरण शोकाकुल बनले आहे. आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची बातमी ज्याक्षणी कळली त्या क्षणी चिंतातुर झालेल्या प्रदीपला एक क्षणही थांबवले नाही. मित्राला भेटण्याच्या घाईने आणि चिंतेमुळेच त्याचा अपघातात झाला. मित्राची भेट मात्र झालीच नाही.