---------------------
धारदार शस्त्र बाळगणारा जेरबंद
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धारदार शस्त्र बाळगणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद करून त्याच्या ताब्यातून कुकरी (सुरी) जप्त करण्यात आली आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तरुण धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी संशयित तरुण अजय राजू दहातोंडे (१९ रा.वडगाव) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्या कमरेला १४ इंच लांबीची धारदार कुकरी (सुरी) मिळून आली. विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी अजय दहातोंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------
अंगणवाडी कार्यकर्त्यांना ऑक्सिमीटर वाटप
वाळूज महानगर : जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्यावतीने गुरुवारी पंढरपुरातील अंगणवाडी कार्यकर्त्यांना ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना पंढरपुरातील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आयोजित कार्यक्रमात ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले.
----------------------
कामगार चौकात नाल्या तुंबल्या
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्याची सफाई न केल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. तीन दिवसांपासून वाळूज परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, नाल्याची सफाई न केल्याने औरंगाबाद-नगर महामार्गावर पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. या पाण्याच्या तळ्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
------------------------------
सिडको महानगरात रस्त्यावर पावसाचे पाणी साचले
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील सारा कृती फेज-१ येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिक व वाहनधारकांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. या परिसरात सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने जोरदार पाऊस आल्यावर पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर साचते, तसेच नागरिकांच्या घरातही पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
----------------------------