शेंद्रा : कंपनीच्या आवारातील राहत्या घरी लाईटचे काम करत असताना विजेचा धक्का लागून २४ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शेंद्रा एमआयडीसीत डी. १८६ मधील उसारा पॉलिहाऊस या कंपनीत शुक्रवारी घडली. मंगेश जगन्नाथ जाधव असे मृताचे नाव आहे.
शुक्रवारी कंपनीला सुटी असल्याने कंपनीत इतर कामगार उपस्थित नव्हते. जाधव हे कंपनीच्या आवारातच राहत होते. त्यांचा लाईट खराब झाल्याने लोखंडी सिडीने लाईट बदलत असताना हा प्रकार घडला. त्यावेळी त्यांची आई घरात उपस्थित होत्या.
त्यांनी वायर जोराने ओढले व विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यांना तात्काळ चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर औरंगाबादच्या घाटीत हलविण्यात आले. तेथे दुपारी २ वाजता जाधव यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगी व २ महिन्यांचा मुलगा आहे. त्यांची पत्नी मुलांसह मोहरी गेलेली असताना हा प्रकार घडला.