औरंगाबाद : अति मद्यसेवनामुळे श्याम फाजगे (वय ३९,रा. विजयनगर)या तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी विजयनगर चौकातील देशी दारू दुकानावर हल्लाबोल केला. दुकानातील दारूचे बॉक्स रस्त्यावर आपटून ते पेटवून देण्यात आले. दुकानातील दारूची तोडफोड केली आणि रस्त्यावरही दगडफेक केली. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास झालेल्या या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे विजयचौकात तणाव निर्माण झाला.
याविषयी अधिक माहिती अशी की, विजयचौकात एम.के. जैस्वाल यांचे देशी दारूचे दुकान आहे. या दारू दुकानामुळे परिसरातील अनेक तरूणांना दारूचे व्यसन जडले आहे. यात श्याम फाजगे हा सामाजिक कार्यकर्ता होता. परिसरातील सामान्यांच्या सुख-दु:खात सदैव धावून जात असे. मुलांची भांडणे होऊ नये, यासाठी प्रयत्न करायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो दारूच्या आहारी गेला होता. दारूमुळे त्याची प्रकृती बिघडली होती.
सोमवारी सकाळी तो घरातच बेशुद्ध पडला. त्यास घाटीत दाखल केले असता अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. श्यामचे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास काबरानगर येथील स्मशानभूमित त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय चौकातील दारू दुकानच श्याम च्या मृत्यूला कारणीभूत आहे. अशी संतप्त भावना अंत्यसंस्कारप्रसंगी नातेवाईक आणि परिसरातील नागरीक व्यक्त करीत होते. अंत्यसंस्कार आटोपून विजयनगरमध्ये आल्यानंतर चारशे ते पाचशे नागरिकांनी थेट विजय चौकातील दारू दुकानाचे कुलूप तोडून दुकानावर हल्ला चढविला. दुकानातील दारूचे बॉक्स रस्त्यावर टाकून त्यातील बाटल्या फोडण्यात आल्या. दारूच्या रस्त्यावरच पडलेल्या दारूच्या बॉक्सला आग लावण्यात आली.