जालना : शहरातील चंदनझिरा भागात मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीतील गंभीर जखमी सय्यद सत्तार स. जब्बार (२२) या युवकाचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर तणाव होवू नये म्हणून पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी वेळीच दक्षता घेऊन या भागात कडक बंदोबस्त तैनात केला होता. तसेच त्या तरूणाच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. व आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.चंदनझिरा येथील मुख्य रस्त्यावर एका हॉटेलसमोर २९ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सय्यद सत्तार स. जब्बार व राहुल काकडे यांच्या दोन गटात मारहाण झाली होती. यात सय्यद सत्तारवर चाकुने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यास औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना १७ जुलै रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मारहाण प्रकरणी दोन्ही गटातील परस्परविरोधी तक्रारीवरून १३ जणांविरूद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सय्यद सत्तार स. जब्बार याच्यावर चाकुहल्ला केलाप्रकरणी राहुल काकडे अमोल काकडे, मोहन काकडे व इतर चार ते पाच अनोळखी विरूद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जखमी स. सत्तार स. जब्बार यांचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात ३०२ कलम लावण्यात आली. त्यातील दोन आरोपींना पूर्वीच अटक करण्यात आली होती. तर तिसऱ्या आरोपीस शनिवारी अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जगताप यांनी दिली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी या भागात कडक बंदोबस्त तैनात केला होता. तसेच पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी त्या मुलाच्या घरी जावून कुटुंबियाचे सात्वंन करून कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान त्या युवकाचे वडील सय्यद जब्बार यांनी पोलिस अधिक्षकांना लेखी निवेदन देवून प्रकरणातील इतर आरोपींनाही अटक करण्याची मागणी केली असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चंदनझिऱ्यातील ‘त्या’ तरुणाचा मृत्यू
By admin | Published: July 19, 2015 12:39 AM