औरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपावरून शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यात वाद सुरू झाल्याची चर्चा आहे. माजी पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना दिलेला निधी रद्द करून तो खा. खैरेंच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना देण्यात यावा, अशी मागणी डॉ. सावंत यांच्याकडे करण्यात आल्यामुळे त्यांनी औरंगाबादेत येण्याचे टाळण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. शिवाय पालकमंत्री पदावरही त्यांची काम करण्याची इच्छा नसल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटातून ऐकण्यास मिळत आहे.
निधी वाटपाच्या पत्रावरून पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या स्वीय सहायकाला खा. खैरे गटाकडून अरेरावीची भाषा वापरली गेल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री विमानतळावर शहीद किरण थोरात यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते. ते विमानतळातून बाहेर न येताच तसेच परतणार होते. त्यामागे डीपीसी निधी वाटपावरून झालेल्या खडाजंगीचे कारण होते, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटातून कानावर आली आहे. जानेवारी महिन्यात शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना पालकमंत्री पदावरून हटविण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांना संधी देण्यात आली. तीन महिन्यांतच सावंत यांना येथील गटबाजीचा अनुभव आला आहे. कदम पक्षाचे नेते आहेत व त्यांनी दिलेली कामे ही आपल्याच कार्यकर्त्यांकडे आहेत, त्यामुळे पुढील नियोजनात काम वाटप करताना नवीन कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल, असे सावंतांनी खा. खैरे यांना समजावल्यामुळे खैरेंना त्यांचा प्रचंड राग आल्याची चर्चा आहे.
सावंतांची मातोश्रीवर धावपालकमंत्री डॉ. सावंत यांनी गेल्या आठवड्यात घडलेला प्रकार मातोश्रीवर सांगितल्याचे कळते. औरंगाबादमध्ये काम करण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी वरिष्ठ पातळीवर कळविल्याची माहिती सेनेच्या गोटातून बाहेर आली आहे. याप्रकरणी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.