बनोटी : सोयगाव तालुक्यातील वाडी येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याने विष प्राशन करुन गुरुवारी रात्री आत्महत्या केली. सुभाष महारु सोनवणे (३७) असे मृत शेतक-याचे नाव आहे. सोनवणे यांच्याकडे वाडी शिवारात तेरा एकर कोरडवाहू जमीन असून यावर्षी मका, कपाशी, बाजरीची लागवड करण्यात आली होती. पावसाने दगा दिल्याने शेतीसाठी लागलेला खर्च देखील निघाला नाही.
घरात मोठा असल्याने सुभाष सोनवणे यांच्यावर कमी वयात सर्व जबाबदारी येऊन पडली. त्यात वडीलांचा दवाखान्याचा खर्च, मुलांचे शिक्षण, महागाई, सततचा दुष्काळ यामुळे कर्जाचा भार वाढत गेल्याने सुभाष सोनवणे यांनी बापू बोरसे यांच्या मालकीच्या दगडी शिवारातील निंबाच्या झाडाखाली विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. ठाणे अंमलदार सुभाष पवार, दिलीप तडवी, कौतिक सपकाळ, दीपक पाटील आणि महसूल विभागाने पंचनामा केला. बनोटी येथील आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप राजपूत यांनी उत्तरीय तपासणी केल्यावर वाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.