औरंगाबाद : निवडणुकीत मते मागताना आपल्यासमोर कुणाची औलाद येत आहे ते पाहा. हा शिवरायांचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवशाही हवी की रझाकारी पाहिजे, हे ठरवून मतदान करण्याचे आवाहन शुक्रवारी केले. एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी जोरदार टीका केली.भाजपसोबत युती का केली, हे स्पष्ट करीत ते म्हणाले, कर्जमाफी अजून बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. पंतप्रधान विमा योजनेचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकºयांचे कर्ज माफ नव्हे, तर कर्जमुक्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. शेतकºयांच्या योजनांबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. त्या योजनांतील अटी व शर्थी काढून टाकण्याबाबत बोललो असून, त्यांनी ते मान्य केले आहे. त्यांना एकच साकडे आहे की, ज्या योजना जाहीर केल्या त्या चांगल्या आहेत. त्या योजना तळागाळापर्यंतच्या शेतकºयांपर्यंत पोहोचतील हे पाहिले पाहिजे. यंत्रणेला कायद्याचा बांबू दाखवा. तसे झाले तर प्रचाराची गरजही पडणार नाही.निवडणुकीमुळे दुष्काळाला विसरलेलो नाही. निवडणुकीनंतर तातडीने मराठवाड्यातील दुष्काळी भागात टँकर, चाºयासाठी व्यवस्था केली जाईल. सामूहिक विवाह सोहळ्यासाठीदेखील मदत केली जाईल. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार चारा छावण्यांना भेट देत आहेत. केंद्रात कृषिमंत्री होते ना ते. यापूर्वी कधी चारा छावण्या पाहिल्या नाहीत काय, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेशी जो गद्दारी करील त्याला सोडणार नाही, आमदार (हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता) असला तरी त्याची आज पक्षातून हकालपट्टी करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आ. जयदत्तअण्णा क्षीरसागर आदींची भाषणे झाली.
'शिवशाही हवी की रझाकारी, हे ठरवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 5:13 AM