औरंगाबाद : पुणे व नागपूरप्रमाणे रात्री १० वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये हॉटेल्स चालकांना डायनिंग सेवा देण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai ) यांच्याशी चर्चा केली. नागपूर, पुणे आणि औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा पॉॅझिटिव्हिटी दर किती याची तुलना करून औरंगाबादमधील हॉटेल्सची वेळ वाढविण्याचा निर्णय होईल. मुख्य सचिवांशी चर्चा करून पालकमंत्री मंगळवारी सायंकाळपर्यंत औरंगाबादसाठी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, पालकमंत्री देसाई यांच्याशी हॉटेल्सची वेळ वाढविण्याबाबत चर्चा केली आहे. पुण्यात शहरात तर नागपूरमध्ये पूर्ण जिल्ह्यात परवानगी दिली आहे. औरंगाबादचा कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी दर कमी आहे. त्यामुळे येथे वेळ वाढवून मिळणे शक्य होईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यांपासून हॉटेल, परमिट रूम चालकांचे निर्बंधांमुळे कंबरडे मोडले आहे. नाइटलाइफवरील बंधने कायम आहेत. सर्व हॉटेल्समध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत डायनिंगला परवानगी आहे. शनिवार, रविवार फक्त पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी करता येत आहे. हॉटेल्स व्यवसाय रात्री १० वाजेपर्यंत तरी सुरू राहावा, अशी मागणी सुरू आहे.
शहराबाहेर सगळे आलबेलशहरातच हाॅटेल्सवर वेळ आणि डायनिंग सेवा देण्याची बंधने आहेत. शहराबाहेर मात्र सर्व काही सर्रासपणे सुरू असल्याची ओरड नियमित कर भरणारे परमिट रूम चालक करीत आहेत. त्यातच वाइन शॉप्सना कुठलीही बंधने नाहीत, त्यामुळे परमिट रूममधून कुणीही मद्य खरेदी करीत नाही. वाइन शॉपवरून मद्य खरेदी करून अनेक जण शहराबाहेरील ढाब्यांकडे जातात. लाखो रुपयांचे लायसन्स शुल्क भरून जर व्यवसाय करण्याची मुभा नसेल, तर लायसन्स शुल्क माफ करावे, अशी मागणीदेखील परमिट रूम चालक करीत आहेत.