पर्यटन उद्योग सुरू करण्यासाठी शासन दरबारी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल आ. अंबादास दानवे, पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलन चावले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘टुरिझम पोटॅन्शियल ऑफ औरंगाबाद’ हे पुस्तक सत्कारमूर्तीना भेट देण्यात आले.
उद्योजक सुनीत कोठारी, मानसिंग पवार, हरप्रीत सिंग, सुनील चौधरी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, पपींद्रपाल सिंग, डॉ. दुलारी कुरेशी यांची विशेष यावेळी उपस्थिती होती.
मागील १० वर्षात शहरात पर्यटन परिषद झाली नाही, असे प्रारंभीच, मानसिंग पवार यांनी सर्वांच्या निदर्शनात आणून दिले. पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा परिषदांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. डीपीसीच्या नियोजनात ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, त्यासाठी दर वर्षी किंवा दोन वर्षाने एकदा अशी परिषद करता येऊ शकते, असेही त्यांनी सुचवले.
आ. दानवे यांनी आश्वासन दिले की, शासनाकडून त्यासाठी निधी उपलब्ध करून घेऊ. शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही तर मी माझ्या फंडाचा निधी देईन. अत्यावश्यक असेलच तर सर्व मिळून अशी परिषद घेता येईल, असेही नमूद केले.
औरंगाबाद टुरिझम फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी प्रास्ताविक केले.
चौकट
बुद्धगयेपासून पर्यटक थेट इथे आले पाहिजेत
उद्योजक सुनीत कोठारी यांनी सांगितले की, पर्यटनासाठी बुद्धगयेला जाणाऱ्या पर्यटकांना येथे येण्यासाठी आकर्षित करणे आवश्यक आहे. येथे ॲग्री टुरिझमसाठी अपेडाचे ऑफिस असणे आवश्यक आहे. मुलांसाठी मनोरंजन पार्क असावे. बॉटनिकल गार्डन, व्हर्टिकल गार्डन असावे. मोठे खेळाचे मैदान व येथे मॅच झाल्यास मोठ्या प्रमाणात लाभ होईल असे सुनीत कोठारी यांनी सुचवले.
चौकट
विकास कामे करताना अडथळे
येथे काम करत असताना थेट कोर्ट स्टे आणण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या विकासात अडथळा निर्माण होत आहे, अशी खंत व्यक्त करत भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मिलन चावले यांनी सांगितले की, दौलताबाद किल्यावर ८ विविध कामांचा विकास करण्यासाठी प्रस्ताव तयार करत आहे. वेरूळ, बेबी का मकबरा येथेही अतिक्रमण अडचण आहे. पर्यटकांना फ्रेंडली वातावरण मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.