औरंगाबाद : महापालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचा निर्णय लाल फितीत अडकला आहे. दोन महिन्यांपासून इमारतींप्रकरणी काहीही निर्णय होत नाही. दोन दिवसांपूर्वी कुंभारवाडा येथील जुने घर पावसामुळे पडले. सुदैवाने तेथे जीवितहानी झाली नाही. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा मुद्दा चर्चेला येतो; परंतु प्रशासन त्यावर काहीही कारवाई करीत नाही.२ महिन्यांपासून त्या इमारतींची संचिका अधिकाऱ्यांच्या टेबलवरून फिरते आहे. दुर्दैवी घटना घडण्याची पालिका प्रशासन वाट पाहत असल्याचे यातून दिसते आहे. शहरातील जुन्या भागात धोकादायक इमारती आहेत. यामध्ये गुलमंडी, कासारीबाजार, रंगार गल्ली, दिवाण देवडी, सिटीचौक, राजाबाजार, शहागंज, पानदरिबा, औरंगपुरा, दलालवाडी, चुनाभट्टी, पैठणगेट या भागांमध्ये जुन्या इमारती असल्याचा अहवाल पालिकेने तयार केला आहे. गेल्या वर्षी ४० पर्यंत असलेला धोकादायक इमारतींचा आकडा या वर्षी ७५ पर्यंत गेला आहे. मागील वर्षात फक्त ६ इमारतींना पालिका प्रशासकीय विभागाने कुलूप लावले आहे. उर्वरित इमारती भाडेकरू आणि मालक यांच्या वादामुळे रिकाम्या करून घेता आल्या नाहीत. त्यामुळे इमारती धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. अंदाजे ५०० नागरिक या इमारतींमधून राहत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केले. जुन्या इमारतींचे वयोमान १०० वर्षांहून अधिक आहे.जुने बांधकाम लाकूड, माती, चुना वापरून करण्यात आले आहे. त्यांची उभे राहण्याची क्षमता संपली आहे. शहरातील गजबजलेल्या भागांमध्ये त्या इमारती आहेत. त्यामुळे त्या रिकाम्या कराव्यात, असे शासनाचे आदेश पालिकेला आहेत.
निर्णय लाल फितीत
By admin | Published: September 11, 2014 1:17 AM