औरंगाबाद : शहरात २० मेपर्यंत १०० टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यापुढे लॉकडाऊन १०० टक्के ठेवायचे की सम-विषम तारखांना ठेवायचे याबाबत १९ मे रोजी विभागीय प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या समन्वय बैठकीतील निर्णयानुसार ठरेल, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी रविवारी दिले.
अचानकपणे लॉकडाऊनमध्ये बदल करण्याचे निर्णय होत आहेत, रात्री उशिरा त्याबाबतची माहिती दिली जाते. ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांना ती माहिती मिळत नाही. त्यामुळे दूध, भाजीपाला विक्रेता शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच रमजान ईदच्या अनुषंगाने किमान खाद्यपदार्थ खरेदीसाठी लॉकडाऊनमध्ये सवलत असणार आहे की नाही, याबाबतचे प्रश्न नागरिकांना पडले आहेत. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, ३१ मेपर्यंत सरकारने लॉकडाऊन वाढविले आहे. ग्रामीण भागात जे लॉकडाऊन आहे ते तसेच सुरू राहणार आहे. शहरात २० ते ते २४ मेपर्यंत लॉकडाऊन कसे असेल याबाबत १९ मे रोजीच निर्णय होईल. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन कडक करण्यात आल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.
...तर ते लॉकडाऊन मानवतेच्या विरोधात ठरेल -इम्तियाज जलीलमागील दोन महिन्यांपासून औरंगाबादकर लॉकडाऊनला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. कोरोना विषाणूंची साखळी ब्रेक करण्यासाठी सलग तीन दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर आणखीन तीन दिवस वाढवून देण्यात आले. प्रशासन जर २४ मेपर्यंत सलग लॉकडाऊन वाढविण्याचा विचार करीत असेल तर ते अमानवीय होईल. त्याला माझा कडाडून विरोध राहणार आहे, असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. प्रशासनाने मध्यरात्री औरंगाबादमध्ये तीन दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याची संधीही मिळाली नाही. कोरोनाचा पराभव करण्यासाठी लॉकडाऊनला आणखीन तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली. २० मेपर्यंत नागरिक हे सहनसुद्धा करतील. मात्र, २४ मेपर्यंत सलग लॉकडाऊन वाढविण्याचा प्रशासन विचार करीत असेल तर तो चुकीचा आहे. पोलीस आणि लष्कर आणून हे सर्व करायचे असेल तर नागरिक सहन करणार नाहीत. नागरिकांना दररोज दुधाची गरज भासते. ज्यांच्या घरांमध्ये लहान लहान मुले आहेत त्यांचा तरी विचार झाला पाहिजे.
दहा दिवस सामान्य माणसाने जगायचे कसे?विभागीय आयुक्तांनी २० तारखेनंतर २४ तारखेपर्यंत सलग लॉकडाऊन वाढविण्याचे केलेले सूतोवाच हे सामान्य जनतेवर अन्यायकारक ठरणारे असून, त्याबाबत प्रशासनाने योग्य तो विचार करावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मोहसीन अहमद यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन सलग २४ तारखेपर्यंत वाढविल्यास सामान्य आणि हातावर पोट असणाऱ्या जनतेवर अन्यायकारक ठरेल. यामुळे प्रशासनाने जनतेचा विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. सलग सहा दिवस संपूर्ण लॉकडाऊन घेतल्यानंतर तुम्ही एक-दोन दिवस ठराविक वेळ जनतेला जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
शहरात दूध विक्रीला परवानगीकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी घेऊन आलेल्या नाशवंत पालेभाज्या व्यापाऱ्यांना इतर जिल्ह्यांत विक्रीसाठी नेता येतील; परंतु नव्याने जिल्ह्यातून भाजीपाला समितीत आणता येणार नाही. मात्र, शहरात घरोघरी पोहोचविण्यात येणारे दूध, तसेच दूध बॅग विक्री करण्यास परवानगी देण्यात आल्याचे पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांनी सांगितले.जिल्हा पुरवठा अधिकारी किरवले, अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी रविवारी बाजार समितीमध्ये भेट दिली व उपलब्ध असलेला शेतीमाल, नाशवंत पालेभाज्या, फळे आदींबाबत आढावा घेतला. तसेच व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांचीही उपस्थिती होती.
१९ मे रोजी झारखंडसाठी रेल्वेऔरंगाबादहून नववी रेल्वे झारखंडला १९ मे रोजी सोडण्यात येईल. २ रेल्वे बिहारसाठी सोडण्यात येणार आहेत; परंतु अद्याप बिहार शासनाने मंजुरी दिलेली नाही. औरंगाबाद प्रशासनाने रेल्वेसाठी मागणी केली आहे