औरंगाबाद : जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेसची युती तोडण्याचे बुधवारी महापौर बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर निश्चित झाले आहे. पुढील जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यात येईल, असा शब्द शिवसेनेने भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला. जि.प.तील काँग्रेससोबतची युती न तोडल्यास लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून अंग काढून घेऊ, असा इशारा भाजपने दिल्यामुळे शिवसेनेने दोन पाऊल मागे घेत आज महापौर बंगल्यावर राजकीय तह केला.
जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी करून घेण्याचा शब्द देऊन शिवसेनेने भाजपला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोंजारले आहे. भाजपचे सर्वाधिक जि.प.सदस्य निवडून आलेले असताना शिवसेनेने काँग्रेसशी घरोबा करून जि. प. अध्यक्षपदासह सर्व सत्ता ताब्यात घेतली व उपाध्यक्षपद काँग्रेसला दिले. त्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये राज्यपातळीवर सख्य नव्हते. त्यामुळे भाजपला दूर ठेवून सेनेने काँग्रेसशी युती करून सत्ता ताब्यात घेतली. हा प्रकार भाजपच्या जिव्हारी लागल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेला नमविण्यासाठी भाजपने जि.प.च्या सत्ता समीकरणाचा मुद्दा काढला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आधी जि.प.मध्ये सुरू असलेला काँग्रेस सोबतचा संसार शिवसेनेने मोडावा, त्यानंतरच पूर्ण ताकदीने प्रचारात उतरू, असा इशारा भाजपने दिल्यानंतर २७ मार्च रोजी युतीच्या समन्वयकांची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. खा.चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रवक्ते शिरीष बोराळकर आदींची बैठकीला उपस्थिती होती.
भाजप प्रदेश उपाध्यक्षांचे मत...भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड म्हणाले, महापौर बंगल्यावर चहा-पानासह झालेल्या बैठकीत भाजपच्या मनासारखे झाले आहे. भाजपने सुरुवातीपासून मागणी केली होती, जि.प. व पंचायत समितीतील काँग्रेससोबत असलेली युती सेनेने तोडावी. भाजपने शिवसेनेसमोर प्रस्ताव ठेवला आहे, ज्यांचे सदस्य जास्त त्यांचा अध्यक्ष करायचा. याबाबत सविस्तर बैठक नंतर घेण्यात येईल. पण सध्या औरंगाबाद पंचायत समिती, जि.प., कन्नड येथे भाजपचा सभापती होईल. जि. प. अध्यक्ष भाजपचा होईल. शिवसेनेने काँग्रेससोबत असलेली युती तोडण्याचे जाहीर केले आहे.
सेना जिल्हाप्रमुखांचे मत...शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले, राज्यात सेना-भाजप युती झाली, त्याच दिवशी जि.प.मधील काँग्रेससोबतची युती तोडण्याचा निर्णय झाला होता. सध्या जि.प.मधील पदाधिकारी राजीनामा देण्याचा प्रश्न नाही. परंतु यापुढील म्हणजेच जि.प.अध्यक्ष व सभापती निवडणुकीत शिवसेना आणि भाजपसोबत राहील. युतीच्या सूत्रानुसारच अध्यक्ष व इतर पदांचे वाटप होईल. काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचा विषय संपलेला आहे.
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबलभाजप- २३, शिवसेना- १८,काँग्रेस- १६, राष्ट्रवादी काँग्रेस- ३,रिपाइं- १, मनसे- १.एकूण- ६२