औरंगाबाद, दि.१२ : मागील ३५ वर्षापासून मौजे मांडकी शिवारातील कचरा डेपो विरोधात परिसरातील नागरिकांनी आता वज्रमुठ आवळली असून व्यापक जनआंदोलन उभा केले आहे. कच-याच्या वाढत्या ढीगा-यामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या विरोधात परिसरातील नागरिकांची हा कचरा डेपो हटवावा अशी खूप दिवसांपासूनची मागणी आहे.
मांडकीची ४४ एकर गायरान जमीन कचरा डेपोसाठी मनपाने घेऊन पंचक्रोशीत अस्वच्छता पसरविली आहे. डेपो हटविण्याच्या हालचालीला हेतुपुरस्सर ब्रेक दिला जात आहे. आता डेपो हटविल्याशिवाय माघार नाही. १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपासून मनपाची वाहने डेपोत जाऊ देणार नाहीत, असा एल्गार मांडकीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी पुकारला आहे, असे पत्रकार परिषेदत पुंडलिकराव अंभोरे, डॉ. विजय डक, मनोज गायके यांनी सांगितले.
१९८३-८४ पासून ४४ एकर गायरान जमिनीवर मनपाने कचरा डेपो सुरू केला. सुरुवातीला अनेक शेतक-यांनी डेपोतून कुजलेला कचरा खत म्हणून उचलूनदेखील नेला; परंतु ३५ वर्षांपासून या डेपोतील विदारक परिस्थिती व मरणयातना शेतकरी व नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दोन वेळा कच-यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न फक्त केंद्र शासनाचे अनुदान लाटण्यासाठी झाला. खतनिर्मिती, गॅसनिर्मिती अशी मोठी आश्वासने दाखवून जनतेला पुन्हा प्रदूषणात झोकून दिले आहे. किरकोळ वाटणा-या डेपोत ३५ वर्षांत ६० फूट उंचीचा कच-याचा डोंगर उभा राहिला असून, त्याला हटविण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सध्या नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणार होत असून, वायू, जल प्रदूषण झाल्याने खेड्यातील नागरिकांना डोकेदुखी, त्वचारोगाचे आजार आढळून येत आहेत.
मनपाने एकदाही आरोग्यसेवा किंवा शेजारच्या खेड्यात जनतेला सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला नाही. रस्त्याविषयी विचारले असता तो आमच्या हद्दीत येत नाही असा बहाणा मात्र केला जातो. कचरा डेपो आमच्या हद्दीत मग कशाला टाकता. तो त्वरित हटवावा, आता माघार नाही, असा निर्धार पुंडलिकराव अंभोरे, डॉ. विजय डक यांनी केला आहे.
शाळेत दुर्गंधीचा त्रासकचरा डेपोपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेत इयत्ता सातवीपर्यंतचे एकूण २५० च्या जवळपास विद्यार्थी आहेत. अस्वच्छतेत त्यांना ज्ञानार्जन करावे लागते. दुर्गंधीने आरोग्य धोक्यात आले आहे.
एकही गाडी जाऊ देणार नाही...जोपर्यंत डेपो हलविणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. गुन्हे दाखल करा अन्यथा तुरंगात पाठवा, मनपाच्या ढिसाळपणाला वठणीवर आणणारच, असा इशारा उपसरपंच साईनाथ चौथे, मदन डक, जगदीश चक्कर, रियाज शाह, विष्णू भेसर, संतोष डक, सय्यद पटेल, उपसरपंच अनिल हिवर्डे, रतन काळे, भाऊसाहेब गायके आदींनी दिला आहे.