- प्रदीप धोंडिबा पाटील
रात्रीचं जेवण झाल्यावर आबा वाड्यासमोरच्या फरसबंदी ओट्यावर आपली घोंगडी अंथरूण बसले. तितक्यात त्यांचा थोरला मुलगा वसंता येऊन काही अंतरावर उभा राहिला. काही वेळ असाच गेला. कोणीच कोणाला काही बोलेना. वसंताला आबांना काही तरी बोलायचे होते. परंतु त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. हिंमत एकवटून हळूच म्हणाला, ‘एक इच्यारायचं व्हतं’. ‘काय... बोल की’ ‘आवंदा आऊत मोडायचं म्हन्तो’
वसंताच्या या निर्णयाने आबाला धक्काच बसला. एकाएकी आवाज कठोर करत म्हणाले, ‘का रं का दाडगत आली?’ ‘गुढीपाडवा व्हवून आज पंधरादी झालं. पर आवंदा सालगडी म्हणून भेटना’
‘घरात बसून सालगडी गावल कसा?’
आज पंधरादी झालं फिरून-फिरून पायाला कातोडं -हायलं न्हाई. गावाभोवतालची धा- इस खेडी पालथी घातली. कोणीच हो म्हणीना ‘काय तोडून खाणार हाईत की लेकाचे’
‘खायची चिंताच न्हाई -हायली कुणास. पाच रुपयाला पस्तीस किलो धान्य देतया सरकार घरबसल्या महिन्याला. बिन मोईचं आन् बिन मेहनतीचं’.‘बाकीच्या परपंचासाठी लागतोच की पैसा. तवा तर गरज पडल की’
‘पैशाची गरज पडली की मुंबई- पुण्याला पंधरा- ईस दिसासाठी जातात. रात-दिस राबतात. तेवढ्याच दिसात धा- इस हजार घेऊन येतात. अजून संपले की अजून जातात. असाच चालू हाय त्यांचा परपंच. लोकांना मोकळ्या रानी मोकळं ºहाऊन सवय पडली. कशासाठी वर्सभर तुमच्याकडे बांधीव -हातील. वसंताच्या या माहितीनं आबा गपगारच झाले. थोडा वेळ कोणीच काही बोललं न्हाई. पुन्हा आबा म्हणाले, ‘म्हणून आऊत मोडावं म्हणतूस...’ ‘व्हय’‘कुणबीक कशी चालविणार हाईस मंग’‘त्याला परयाय ट्याकटर हायच की’ ‘काय दातं देऊन ट्याकटर घेणार हाईस?’‘बैलबारदाना आन् गाई-वासरं इकून आलेल्या पैशातून येईल की एखादं ट्याकटर’ ‘इतक्या पिढ्यापासून जीव लावून, पोटच्या लेकरागत जीव लावून जगवलेला जनावरांचा बारदाना इकायचं म्हणतूस’‘मंग काय करू... दुसरा परयायच ºहायला न्हाई माज्याकडं?’‘आरं इतकी वर्स बैल बारदाना सांभाळला आमी, त्याचं काईच न्हाई.’ ‘काई कसं न्हाई. तुमच्या कष्टाच्या जोरावर तर आपुन इथवर आलो. पर आबा आता काळ बदलला..’‘काळ बदलला म्हणून एवढा जीव लावून वाढवलेला बैल बारदाना इकून त्यांची आन् माझी ताटातूट करावं म्हणतोस.’‘त्याची का मला लई हौस हाय का? त्यांच्यात तुमचा जीव किती गुतून हाय हे काय फाईलं न्हाई का म्या आबा’ ‘मंग एकाएकी काळीजच काढून घेयाचा निरणय तू का घ्यावा? त्यांच्या बिगर म्या जगलं वाटते तुला?’ ‘पर ते जगायासाठी त्यांनाबी कुणीतरी चारापाणी करणारं पायजे का न्हाई? आसं भावनिक होऊन कसं चालल आबा. पैसे मोजायची तयारी ठेवूनबी कोणी -हायला तयार नसल तर दुसरा परयायच शोधावा लागल’ त्यो परयाय सोधून ट्याकटर आनसील रं बाबा, पर माझा जीव बैल बारदान्यात, गाई-वासरात आडकलाय त्याचं काय?’ यावर वसंता पुढं काहीच बोलला नाही. आबाचं ऐकून बैलबारदाना न विकता औताचं काम बघून त्या दिवसापुरता मजुरीचा माणूस घेऊन भागवायचाही वसंतानं विचार करून पाहिला. परंतु गरजेला मजुरीचा माणूस तरी कुठला भेटणार हे ही समस्या होतीच. शेवटी नाईलाजाने काळजावर दगड ठेवून वसंतानं ट्याकटर घ्यायचा निर्णय घेतलाच ...! या निर्णयाने आबा किती नाराज होतील की वाटले; परंतु तसं काही घडलं नाही. दारातलं ट्याकटर बघून आबा म्हणाले, ‘वसंता, माझंच चुकलं. तुझा निर्णय बेस झाला. माणसानं येवारात भावनिक व्हवून चालत न्हाई. काळा परमाणं बदलावं लागतं. न्हाईतर उपाशी मरावं लागल’.( patilpradeep495@gmail.com )