खुलताबाद : औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी, वर्ग पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित करा, पुढील शैक्षणिक वर्ष जून २०२१ पासून सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्रात सर्व शाळा आणि महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली. जवळपास एक वर्ष उलटूनही कोरोना विषाणूचा प्रसार अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. त्यात काही दिवसांपासून बाधित रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढतच चाललेले आहे. अशा परिस्थितीत १ली ते ८वी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित केला जावा. शासन निर्णयानुसार ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती राहत आहे. तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होम तत्त्वावर ऑनलाईन अध्यापन आणि शालेय कामकाज करण्याची परवानगी मिळावी आणि पुढील शैक्षणिक वर्ष जून २०२१ पासून सुरू करा, अशी मागणी शिक्षक समितीने केली आहे.