पैठण : जायकवाडीत येणारी आवक घटत असल्याने धरणातून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग आज दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ३५१२५ क्युसेक पर्यंत घटविण्यात आला. गुरुवारी १६ दरवाजातून ४५ हजार क्युसेकपेक्षा जास्त क्षमतेने १६ दरवाजे अडीज फुटाने वर उचलून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत होता. आज अडीच फुटावरून १६ दरवाजे दोन फुटापर्यंत खाली घेऊन जवळपास १० हजार क्युसेक विसर्ग घटविण्यात आला.
गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावल्याने तेथील धरण समूहातून होणारे विसर्ग आज घटविण्यात आले.यामुळे जायकवाडी कडे येणारी आवक गुरूवार पेक्षा निम्मी झाली. आवक कमी होत असल्याने जायकवाडीतून होणारा विसर्ग आज दुपारनंतर घटविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून होणारा एकत्रित विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदापात्रात होतो तो आज २२३८४ क्युसेक्स पर्यंत कमी झाला. गुरूवारी जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या नागमठान बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात ५३२५० क्युसेक विसर्ग मिळत होता तो आज २४८०० ईतका कमी झाला, आवक कमी होत असल्याने जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग आज कमी करण्यात आला.
धरणातून ३६७२५ क्युसेकचा विसर्ग.....१००% भरलेल्या जायकवाडी धरणात ३६७२५ क्युसेक्स क्षमतेने आज आवक सुरू होती तर धरणाचे दोन्ही कालवे, जलविद्युत प्रकल्प व सांडव्यातून मिळून ३६७२५ क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. यामुळे धरणाची १००% पाणीपातळी कायम होती. धरणाचे १६ दरवाजे व जलविद्युत प्रकल्पातून गोदावरी पात्रात ३५१२५ क्युसेकचा विसर्ग आज सुरू होता तर डावा कालवा ७०० व उजवा कालव्यातून ९०० क्युसेक असे पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग कमी झाल्याने जायकवाडीतून होणारा विसर्ग कमी करण्यात आला. धरण १००% भरलेले असेल या दृष्टीने आवक पाहून विसर्ग कमीजास्त करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे व उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.