औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसाठी सुरू केलेल्या पर्यटन बसचे भाडे अखेर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयासाठी या बसचे टी पॉइंट ते लेणीपर्यंतचे अंतर कमी केले जात आहे. त्यामुळे यापुढे पर्यटकांना टी पॉइंटवर सोडण्यात येईल. आजपर्यंत थेट लेणीपर्यंत ही बस धावत होती. परंतु आता पर्यटकांना टी पॉइंटवरून प्रदूषणमुक्त बस पकडावी लागेल.वेरूळ आणि अजिंठा लेणीसाठी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १५ आॅक्टोबर २०१५ पासून पर्यटन बसेस पर्यटकांच्या सेवेत दाखल झाल्या. सुरुवातीला या बसगाड्यांना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु अवघ्या काही दिवसांनंतर पर्यटक नसल्याचे कारण पुढे करून या बसेस रद्द होण्याचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे पर्यटकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रद्द केलेल्या दिवशी त्या पुणे मार्गावर चालविण्यात येत आहेत. अशा प्रकारे बसच्या फेऱ्या वारंवार रद्द होत असल्याने खाजगी वाहतुकीचा आधार घेण्याची वेळ पर्यटकांवर येत आहे. यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयाने या बसगाड्यांचे भाडे कमी करून पर्यटक वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. अखेर अजिंठा पर्यटन बसचे भाडे कपातीस मंजुरी मिळाली आहे. या बसचे भाडे ७२१ ऐवजी ६१५ घेतले जाणार आहे. त्यासाठी यंत्रणेत आवश्यक ते बदल केले जात आहेत.टी पॉइंट ते अजिंठा लेणीपर्यंतच्या ४ कि. मी. अंतरावर ‘एसटी’च्या प्रदूषणविरहित बसेस वगळता इतर वाहनांना प्रवेश बंदी आहे. पर्यटन बस अत्याधुनिक आणि प्रदूषणमुक्त असल्याने थेट लेणीपर्यंत पर्यटकांना सोडण्यात येत होते. परंतु यापुढे भाडे कपातीमुळे पर्यटकांना टी पॉइंटवरच सोडले जाईल. तेथून अन्य बस पकडून लेणीसाठी रवाना होण्याची वेळ पर्यटकांवर येणार आहे. या बसला वाहक दिल्यास टी पॉइंट ते लेणी, अशा फेऱ्या मारून अतिरिक्त उत्पन्नही मिळविता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचारी आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
भाडे कपातीसाठी अंतर घटविले
By admin | Published: July 24, 2016 12:21 AM