औरंगाबाद : १८ वर्षांखालील मुले, मुलींच्या अपहरणाच्या (बेपत्ता होणे) घटना कोरोनामुळे घटल्याचे समोर आले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड वर्षाच्या कालावधीत १४३ मुली घरातून बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी १० मुलींचा शोध अद्याप लागला नाही. त्यांचा शोध बाल सहाय्य पोलीस पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून केला जात आहे.
औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या औरंगाबाद शहराचा चोहोबाजूने विस्तार होत आहे. वाढत्या शहरासोबत शहरातील गुन्हेगारीचा आलेखही वाढत आहे. १८ वर्षांखालील मुला-मुलींना अल्पवयीन म्हणून ओळखले जाते. या वयात त्यांना फारशी समज नसते. याचाच गैरफायदा काही लोक घेतात. तर काही जण मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेतात. तर काही मुली स्वत:हून घरातून निघून जातात. मुलींना वाममार्गाला लावणारे लोकही मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून घरातून पळवून नेतात. अशा वेगवेगळ्या कारणातून शहरात गतवर्षी २०२० मध्ये ९६ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी ९२ मुलींचा शोध लावण्यात पोलीस अधिकाऱ्यांना यश आले होते. यावर्षी जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४७ मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे पोलिसांत नोंद आहेत. यापैकी ४१ मुलींचा शोध पोलिसांनी लावला.
--------------------
आलेख
बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुली आणि कंसात सापडलेल्या मुलींची संख्या
वर्ष
२०१८- १४० (१३८)
२०१९- १३३- (१३०)
२०२०- ९६- (९२)
मे २०२१ पर्यंत - ४७ (४१)-
-------------------चौकट------
९६ टक्के मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश
कायद्यानुसार अल्पवयीन मुलगा अथवा मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त होताच याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद केला जातो. शिवाय पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला जातो. २०१८ पासून मे २०२१ पर्यंत औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ४१६ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. यापैकी ४०१ अल्पवयीन मुला, मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सरासरी ९६.२५ टक्के हे यश असल्याचे दिसून येते.
---------------------------------------------------------------
कोट
अल्पवयीन मुला-मुलींच्या हरवल्याची प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेऊन तपास केला जातो. अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला फौजदारांकडून तपास केला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या तपासावर लक्ष असते; मात्र ९९ टक्के केसेसमध्ये ही मुले स्वत:हून अथवा प्रेम प्रकरणातून घराबाहेर पडतात. अल्पवयीन मुलीस लग्नाच्या आमिषाने पळवून नेल्याचे आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्यावर संबंधितांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई होते.
रवींद्र साळोखे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा.
------------------------------------------
( स्टार डमी क्रमांक ८४३)