औरंगाबाद : ग्रामपंचायत स्तरावरील १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातून खरेदी करण्यात आलेल्या २० रुग्णवाहिकांचे लोकार्पण शनिवारी जिल्हा परिषदेत करण्यात आले. या कार्यक्रमाला वेळेत पोहोचलेले रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी नारळ फोडून रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले, तर तब्बल एक तास उशिराने कार्यक्रमस्थळी पोहोचलेले ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी फीत कापून या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. शिवाय आपल्या प्रयत्नामुळेच या रुग्णवाहिका मिळाल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.
एकाच पक्षाचे दोन मंत्री. एक नियोजित वेळेनुसार कार्यक्रमाला हजेरी लावतात, तर दुसरे नेहमीप्रमाणे तासभर उशिराने कार्यक्रमस्थळी येतात. कार्यक्रम एकच असला तरी दोन्ही मंत्र्यांनी आपापल्या परीने दोन वेळा रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. शनिवारी सकाळी ८.४० वाजता रोहयो मंत्री संदिपान भुमरे हे कार्यक्रम ठिकाणी पोहोचले. त्यांनी रुग्णवाहिकांना नारळ फोडला व पैठण येथे लसीकरण मोहिमेच्या शुभारंभासाठी ते येथून रवाना झाले. ते गेल्यानंतर विलास भुमरे हे कार्यक्रमस्थळी आले व चालकांकडे किल्ल्या सुपूर्द करत तेही पैठणकडे रवाना झाले. तथापि, जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ५० आरोग्य केंद्रांकडे आता रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या असून उर्वरित ५१ व्या आरोग्य केंद्रासही ती लवकर मिळेल, अशी अपेक्षा मंत्री संदिपान भुमरे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
सकाळी १० वाजता राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे जिल्हा परिषदेत पोहोचले. त्यांनी रुग्णवाहिकांचे सायरन सुरू करायला सांगितले व फीत कापून रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. आपल्या प्रयत्नामुळेच आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकल्या, असे सांगून राज्यमंत्री सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचा आणि भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम सभापती किशोर बलांडे, केशवराव तायडे, ज्ञानेश्वर कापसे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके यांची उपस्थिती होती.
चौकट...........
या आरोग्य केंद्रांना मिळाल्या रुग्णवाहिका
लोकार्पण कार्यक्रमानंतर रुग्णवाहिका संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे रवाना करण्यात आल्या. यामध्ये वरुडकाझी, पिंप्रीराजा, कचनेर, वडोदबाजार, पिंपळवाडी, विहामांडवा, आडुळ, बालानगर, लासुरस्टेशन, भेंडाळा, औराळा, वडनेर, चापानेर, नाचनवेल, हतनूर, बाजारसावंगी, वेरुळ, गदाना, जरंडी, सावळदबारा आदी २० प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.