औरंगाबाद : जिद्द, सातत्य आणि संयमातनू कल्पना सत्यात उतरतात. लोक तुम्हाला जेव्हा मूर्ख म्हणतील तीच यशाची खूण समजावी. स्वत:च्या कल्पनांवर विश्वास ठेवल्यास यश तुमचेच आहे, असे मत लेखिका, मोटिव्हेशनल गुरू रश्मी बन्सल यांनी गुरुवारी व्यक्त केले.
देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विश्वकर्मा हॉलमध्ये ‘औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन’ (एएमए) आयोजित रेअर-शेअर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी जि.प. सीईओ पवनीत कौर, एएमएचे चेअरमन सी. पी. त्रिपाठी, सतीश कागलीवाल, प्राचार्य उल्हास शिऊरकर, डॉ.सुनील देशपांडे यांची उपस्थिती होती.
बन्सल म्हणाल्या, प्रत्येकाच्या मनात वेळोवेळी चांगल्या कल्पना येत असतात, त्या कल्पनांवर जो विश्वास ठेवतो तोच पुढे जाण्यात यशस्वी होतो. जेव्हा आपण जगावेगळे काम करतो तेव्हा लोक मूर्खात काढतात. तेव्हा खचून न जाणे हीच यशाची पावती असते. बन्सल यांनी स्वत:च्या आयुष्याचा प्रवास या कार्यक्रमात उलगडला. त्या म्हणाल्या, माझे वडील शास्त्रज्ञ असताना मला मात्र विज्ञान आवडत नव्हते. म्हणून मी १२ वीनंतर कला शाखेत प्रवेश घेतला. नंतर एमबीए केले, पण नोकरी करायची हे ठरविले, दरम्यानच्या काळात वर्तमानपत्रात लिखाण केले. त्या व्यासंगातून पत्रकारितेची आवड निर्माण झाली. मुक्तपत्रकार म्हणूनही काम केले. त्यातच एक मासिक काढले, मात्र त्यात तोटा आल्याने ते बंद केले.
आजवरच्या जीवनप्रवासात अनेक चढउतार अनुभवल्यानंतर ‘स्टे फुलीश स्टे हंग्री’ हे पहिले पुस्तक लिहिले. ते पुस्तक बेस्ट सेलर झाल्याने मी लेखिका झाले. तेथून पुस्तकांचा प्रवास सुरू झाला. डॉटेड लाईन्स, फॉलो एव्हरी रेनबो, टेक मी होम, पुअर लिटिल रिच स्लम ही पुस्तके पुढे लिहिली. पत्रकार, संपादक आणि लेखक असा प्रवास त्यांनी उलगडला.
धारावीतील उद्योजकता पाहाबन्सल यांनी मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील उद्योजकतेची माहिती सांगितली. त्या म्हणाल्या धारावी किती लोकांनी पाहिली आहे. हॉलमधील अनेकांनी हात उंचावले. धारावीत काय पाहिले याचे उत्तर त्यांनी हॉलमधील हात उंचावणाऱ्यांना विचारले. अनेकांनी वेगवेगळी उत्तरे दिली. सर्वांची उत्तरे ऐकल्यानंतर त्या म्हणाल्या, धारावीतील ९० टक्के लोक स्वत:च्या छोटेखानी उद्योगाचे मालक आहेत. दहा बाय दहा इतक्या कमी जागेत त्या झोपडपट्टीत प्रत्येकाचा स्वत:चा काही ना काही व्यवसाय आहे. आपल्याला घर, गाडी, चांगला फ्लॅट असूनही आपण उदासीन असतो; पण धारावीत जाऊन पाहा लोक आनंदीच दिसतील.