औरंगाबाद : घाटी रुग्णालयात १५ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते शिर्डी संस्थानच्या आर्थिक सहकार्यातून प्राप्त एमआरआय यंत्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच कोविड योद्धा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी पालकमंत्री सुभाष देसाई यांची उपस्थिती राहणार आहे.
शिर्डी संस्थानने घाटी रुग्णालयास नव्या एमआरआय उपकरणासाठी मे २०१८ मध्ये १५ कोटींचा निधी दिला. या निधीच्या माध्यमातून घाटीतील क्ष-किरणशास्त्र विभागात अत्याधुनिक असे थ्री टेस्ला एमआरआय यंत्र दाखल झाले. चाचणी रुग्णांच्या तपासणीनंतर हे यंत्र रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे.
घाटीत सोमवारी आयोजित सोहळ्यात अमित देशमुख यांच्या हस्ते या यंत्राचे लोकार्पण होईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) महात्मा गांधी सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचीही यावेळी उपस्थिती राहील, अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी दिली.