औरगाबाद: राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (दि. १६ जानेवारी) शहरातील आठ विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळेदेखील शहरात येणार आहेत. परंतु, त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलेले नाही. काँग्रेसच्या एकाही नेत्याला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चार हात दूर ठेऊन शिवसेनेने निवडणूक अजेंडा राबविण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
या विविध कामांच्या लोकार्पणासाठी ते येणार
कांचनवाडी येथील बायोगॅस प्रक्रिया, युएनडीपी ड्राय वेस्ट सेंटरचे लोकार्पण, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रोड मार्गावर सायकल ट्रॅकचे लोकार्पण, पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील कमांड कंट्रोल सीसीसी सेंटरचे लोकार्पण, टीव्ही सेंटर येथील मिनी स्टेडियम आणि बीओटी शॉपिंग कॉम्पलेक्सचे लोकार्पण, त्यानंतर अमरप्रीत चौक येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे अनावरण, पडेगाव येथील कचराप्रक्रिया केंद्राचे लोकार्पण, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आऊटडोअर डिस्प्लेचे लोकार्पण, बसथांब्यांचे भूमिपूजन, चिकलठाणा येथील कचराप्रक्रिया केंद्राचे लोकार्पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते होणार आहे, असे शिवसेना आ. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याच दिवशी आदित्य ठाकरे शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी सायंकाळी ६ वाजता एका हॉटेलात संवाद साधणार आहेत.
ठाकरे, देसाई यांना मनपाने निमंत्रित केले आहे
१६ जानेवारी रोजी खा.सुळे शहरात आहेत. त्यांना या कार्यक्रमांसाठी का नाही बोलाविले, तसेच काँग्रेसच्या मंत्र्यांना निमंत्रित केले आहे काय, यावर आ. दानवे यांनी पर्यटनमंत्री आणि पालकमंत्री देसाई यांना मनपाने निमंत्रित केल्याचे सांगितले.
चौकट...
मनपाने टाळले तरी शिवसेनेने काळजी घ्यावी
महापालिका प्रशासकांनी महाविकास आघाडी सरकार म्हणून जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना बोलावले पाहिजे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनादेखील कार्यक्रमांना निमंत्रित केले पाहिजे. मनपाने टाळले असले तरी शिवसेना नेत्यांनी तिन्ही पक्षांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत काँग्रेसचे जिल्हाप्रमुख डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केले.