औरंगाबाद : औरंगाबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट केंद्राची प्रशंसा करताना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी या केंद्रातील ७ क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम क्रीडा साहित्य खरेदीसाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. आपण औरंगाबाद येथे येण्याआधीच मान्यता दिली असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले.
विद्यापीठ परिसरातील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील हाॅकी खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲस्ट्रो टर्फ आणि स्विमिंग पूलचा लोकार्पण सोहळा गुरुवारी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता झाला. या प्रसंगी ते बोलत होते. त्याआधी त्यांच्या हस्ते तलवारबाजी हॉलचे भूमिपूजन झाले. त्याचप्रमाणे येथील वेटलिफ्टिंग हॉल व मल्टिपर्पज हॉलची पाहणीही त्यांनी केली. यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, विद्यापीठाचे कुलगुरु प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
औरंगाबाद येथील केंद्र किती महत्त्वाचे आहे हे रिजीजू यांनी सांगितले. ते म्हणाले, अनेक केंद्रात तीन किंवा चारच क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. मात्र, औरंगाबाद येथील केंद्रात सात क्रीडा प्रकार आहे. येथील जिम्नॅस्टिकचे केंद्र बंद करण्यात आले होते. मात्र, आम्ही पुन्हा येथील जिम्नॅस्टिकचे केंद्र सुरु केले आहे. २०२४ व २०२८ मधील ऑलिम्पिकमध्ये औरंगाबाद येथील केंद्रातील १० ते २० खेळाडू खेळतील. येथील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम अत्याधुनिक साहित्यासाठी ५ कोटी रुपयाची मान्यता येथे येण्याआधीच दिलेली आहे. तसेच ३०० बेड हॉस्टेलला २८ कोटी, हॉकी टर्फला ४ कोटी ८४ लाख आणि फेन्सिंग हॉलसाठी २ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
यावेळी ते म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये १३८ कोटींची जनता असताना आपल्याला एक रौप्य अथवा एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागते. भारतात आमची खेळात चांगली परंपरा आहे. मात्र, आमची खेळाची संस्कृती बनली नाही. पदक जिंकल्यानंतर जेव्हा राष्ट्रगीत सुरु होते तेव्हा खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. तेव्हा हे यश सर्व देश साजरा करतो व आनंदाची लहर निर्माण होते. खेळच हा एकजूटता व ताकद निर्माण करु शकतो. त्यामुळे देशात ‘खेलो इंडिया’ व ‘फिट इंडिया’ ही चळवळ सुरु करण्यात आली. खा. भागवत कराड आणि इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथील केंद्रात एनआयएस डिप्लोमा कोर्स, ॲथलेटिक्स सिंथेटिक ट्रॅकची मागणी केली. हा धागा पकडताना रिजीजू यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार केला जाईल, असा शब्द दिला.