औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधर गटात वसंतराव काळे मित्रमंडळ- विद्यापीठ बचाव समिती स्थापन करत आण्णासाहेब खंदारे, भाऊसाहेब राजळे यांनी ‘टीए-डिए’साठी निवडणूक लढविणा-या उमेदवारांचा पराभव करा, असे आवाहन केले. तसेच डॉ. उल्हास उढाण, शिवाजी लकडे आणि प्रशांत पवार या उमेदवारांना पाठिंबा असल्याचेही जाहीर केले.
विद्यापीठ अधिसभेसाठी दुस-या टप्प्यात पदवीधर गटात सोमवारी (दि.४) मतदान होणार आहे. या निवडणुकीत इच्छूकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, उत्कर्ष पॅनल, विद्यापीठ विकास मंचसह एकुण पाच पॅनल लढत आहेत. यात बुधवारी स्वर्गीय वसंतराव काळे यांचे सहकारी राहिलेले आण्णासाहेब खंदारे, भाऊसाहेब राजळे, प्रा. दिलीप बडे, बुद्धप्रिय कबीर, बामुक्टोचे पदाधिकारी डॉ. मारोती तगमपुरे, डॉ. उमाकांत राठोड आणि काँग्रेसचे राजेश मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत डॉ. उल्हास उढाण, शिवाजी लकडे आणि प्रशांत पवार हे आमच्या गटाचे उमेदवार असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना खंदारे म्हणाले, विद्यापीठात मागील पाच-सहा वर्षांपासून अनागोंदी निर्माण झाली आहे. या अनागोंदीला पायबंद घालण्यासाठी अभ्यासू व्यक्ती अधिसभेत जाणे आवश्यक आहे. यासाठी निव्वळ माना डोलावणारे आणि ‘टीए-डीए’साठी बैठकांना येणा-यांना मतदान करु नका, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. याशिवाय चळवळीत वाढलेल्या कार्यकर्त्यांचा अभ्यास असतो. त्यांना विद्यार्थ्यांच्या समस्या माहित असतात. अशा उमेदवारांना निवडूण देणे आवश्यक असल्याचे भाऊसाहेब राजळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत डॉ. उमांकात राठोड, डॉ. मारोती तेगमपुरे यांनी बामुक्टो संघटनेचा डॉ. उल्हास उढाण यांना पाठिंबा असल्याचे सांगितले. तर पुरोगामी शिक्षक संघटनेनेही फोनवरून पाठिंबा जाहीर केला.
बामुक्टोचा निर्णय झालेला नाही : म्हस्के
डॉ. उल्हास उढाण यांना प्राध्यापकांच्या बामुक्टो संघटनेचा पाठिंबा दोन पदाधिकाºयांनी जाहीर केला. मात्र याला दोन तास उलटताच संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाप्पासाहेब म्हस्के यांनी संघटनेने पाठिंबा देण्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. पाठिंबा जाहीर करण्याचे अधिकार केंद्रीय कार्यकारिणीला आहेत. या कार्यकारीणीची बैठक झालेली नाही. त्यामुळे संघटनेचा कोणालाही पाठिंबा नसून, ज्यांनी घोषणा केली. त्यांना तो अधिकारच नसल्याचेही डॉ. म्हस्के यांनी स्पष्ट केले.