वैजापूर : तालुक्यातील दहेगाव/राहेगव्हाण गट ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. यात माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या स्नुषा सुहासिनी काकासाहेब पाटील यांचा एक मताने पराभव झाला आहे. त्यांचेे प्रतिस्पर्धी उमेदवार मोहन मार्तंड उगले हे पाच मते मिळवून सरपंचपदी विराजमान झाले आहेत, तर उपसरपंचपदी मीराबाई बाळासाहेब बुट्टे यांची निवड झाली आहे.
दहेगाव हे माजी खासदार दिवंगत रामकृष्ण बाबा पाटील यांचे गाव असल्याने शुक्रवारी पार पडलेल्या विशेष सभेकडे सर्व गावांचे लक्ष लागले होते. यावेळी सर्वसाधारण जागेसाठी असलेल्या सरपंचपदासाठी मोहन उगले व सुहासिनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले होते, तर उपसरपंचपदासाठी मीराबाई बुट्टे, पूजा त्रिभुवन व वंदना उगले यांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत हे सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. मात्र, पूजा त्रिभुवन यांनी उपसरपंचपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने मीराबाई बुट्टे व वंदना उगले यांच्यात सरळ लढत होऊन मीराबाई एका मताने विजयी झाल्या. सरपंचपदासाठी झालेल्या सरळ लढतीत सुहासिनी पाटील यांना चार, तर मोहन उगले यांना पाच मते मिळाली. यामुळे अध्याशी अधिकारी एम. यू. भिंगारे यांनी मोहन उगले व मीराबाई बुट्टे यांना विजयी घोषित केले. या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य मीना उगले, किशोर पंडित, सोमीनाथ सोनवणे, समाधान त्रिभुवन यांच्यासह सर्व नऊ सदस्य उपस्थित होते.
फोटो : दहेगाव
120221\1613130619-picsay_1.jpg
दहेगाव