औरंगाबाद : खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने ही महाविकास आघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपले पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाविकास आघाडीला अधिक बळकट करण्यासाठी उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन गुरुवारी केले.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ रामनगर येथील सुशीलादेवी विद्यालयात आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहीम पठाण, रवींद्र काळे, एकनाथ गवळी, शिवसेनेचे माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे, मोतीलाल जगताप, कमलाकर जगताप, मनोज गांगवे, सुभाष पांडभरे, मोतीलाल जगताप, भाग्यश्री राजपूत उपस्थित होते.
देसाई म्हणाले, १६८० कोटींची पाणी योजना लवकरच मार्गी लागेल. यामुळे औरंगाबादकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. त्याचबरोबर मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांचा रोजगारासाठी हे महाविकास आघाडी सरकार निर्भयपणे आणि धाडसी निर्णय घेऊन महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध आहे. पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा विधान परिषदेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन देसाई यांनी केले.
उमेदवार सतीश चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यातील पदवीधर भाजपवाल्यांना चारीमुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. कल्याण काळे यांनीही मार्गदर्शन केले.
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा पाठिंबा
मराठवाड्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू रणजित पवार, दिनकर तेलंग (बॅटमिंटन), प्रा. एकनाथ साळुंखे (हँडबॉल), आदित्य जोशी (जिम्नॅस्टिक), राहुल तांदळे (जिम्नॅस्टिक), सागर कुलकर्णी (जिम्नॅस्टिक), दिनेश वंजारे (तलवारबाजी), सागर मगर (तलवारबाजी), डॉ. अजित पवार (जिम्नॅस्टिक), परशुराम वाखुरे (कबड्डी) यांनी सतीश चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला.