लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे़ दिग्गजांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यामुळे या निवडणुकीत सेनेची सर्व भिस्त नवसैनिकांवरच आहे़ मंगळवारपासून सुरु झालेल्या मुलाखतीत त्याची प्रचिती येत होती़मावळत्या महापालिकेत शिवसेनेकडे विरोधी पक्षनेता पद होते़ तर भाजपाचे केवळ दोन नगरसेवक होते़ त्यावेळी भाजपाला सर्व ठिकाणी उमेदवारही मिळाले नव्हते़ आज नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे़ भाजपाकडे तिकिटांसाठी एकीकडे रांगा असताना, शिवसेनेच्या गोटात मात्र सर्व काही शांत-शांत होते़ मंगळवारी प्रभाग क्रमांक १ ते १२ साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते़ सकाळपासून या मुलाखतीला सुरुवातही झाली, परंतु सेनेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही़ काही प्रभागातील जागांसाठी तर उमेदवारच नव्हते़ पॅनलप्रमुख कोण होणार? त्याचाही वेगळा विषय आहे़ दिग्गजांनी जय महाराष्ट्र केल्यामुळे सेनेतील नवख्या कार्यकर्त्यांनी आता पक्षाकडून उमेदवारी मागितली जात आहे़ सेनेची पहिली यादी २१ सप्टेंबरच्या रात्री प्रसिद्ध केली जाणार , असे आ़ हेमंत पाटील म्हणाले़परंतु २२ सप्टेंबरपर्यंत सेना ‘वेट अॅन्ड वॉच’ करेल असा अंदाज आहे़ कारण भाजपाकडून तिकीट न मिळालेले बंडखोर पुन्हा घरवापसी करु शकतात़ असाही अंदाज बांधला जात आहे़ १२ प्रभागांसाठी एकूण ३५० जणांनी सेनेकडे उमेदवारी मागितली आहे़ त्यामध्ये मंगळवारी दिवसभरात ६० जणांच्या मुलाखती झाल्याचे आ़पाटील म्हणाले़ बुधवारी प्रभाग क्रमांक १३ ते २० मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत़याबाबत आ़ पाटील म्हणाले, शिवसेनेकडे शेकडो जणांनी उमेदवारी मागितली आहे़ मुस्लिमबहुल भागातूनही सेनेकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत़ आरपीआयसोबत युतीबाबत आमची चर्चा सुरु आहे़ कारण दलित समाजाचा आजपर्यंत काँग्रेसने वापरच केला आहे़ दलित नेतृत्व संपविण्याचे काम त्यांनी केले आहे, असा आरोपही आ़ पाटील यांनी केला़
सेनेची भिस्त नवसैनिकांवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:43 AM