औरंगाबाद : लोकसभा निवडणूक आचारसंहितेत निवडणूक विभाग भरारी पथकांनी आजवर ५४ लाखांची रोकड आणि १० हजार लिटर दारू जप्त केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा, तर जालन्यातील तीन, अशा एकूण नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल ३७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरासह गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आदी ठिकाणी एक लाखापेक्षा जास्त रोख रक्कम बाळगून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. भरारी पथकांनी जप्त केलेल्या बेहिशोबी रकमेची चौकशी केली जाईल. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर या चौकशी समितीच्या प्रमुख आहेत. रकमेचा हिशेब दिल्यास रक्कम परत केली जाईल. पहिल्या टप्प्यात जप्त केलेल्या ३८ लाख रुपयांच्या प्रकरणांची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे, त्यावर निर्णय होईल, असे चौधरी म्हणाले.