औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने १६ मार्चपासून पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध असणार आहेत.
कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याला ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कोठूनही देता येईल. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा द्यायची आहे. त्यांना त्यांचे महाविद्यालय हे परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यापीठाने काही महाविद्यालयांची परीक्षा केंद्रे रद्द केलेली आहेत, त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची व्यवस्था इतर महाविद्यालयांत करण्यात येणार आहे. परीक्षेत प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा ठेवला आहे. दररोज दोन सत्रांत ऑनलाईन परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या सत्रात तीन, तर दुपारच्या सत्रात तीन तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५ असे परीक्षेचे सत्र राहणार आहे. हा कालावधी केवळ काही तांत्रिक अडचणी येतील म्हणून देण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांनी फक्त एक तासात पेपर सोडवायचा आहे. ऑफलाईनसाठी सकाळच्या सत्रात एक तास व दुपारच्या सत्रात एक तासाप्रमाणे सकाळी ११ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते ४ ही वेळ राहील.
परीक्षेत अडचण आल्यास काय करावेपरीक्षेसंदर्भात अडचण आल्यास त्या सोडविण्यासाठी विद्यापीठाने पाच अधिकांऱ्याची समिती नियुक्त केली आहे. या समितीत उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा, डॉ. प्रताप कलावंत, ए. मु. पाटील, राजेंद्र गांगुर्डे, महेंद्र पैठणे, आदींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांना या समिती सदस्यांकडे तातडीने संपर्क साधता येईल. विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व परीक्षा मंडळ यांच्या मान्यतेने परीक्षांचे वेळापत्रक व नियमावली घोषित करण्यात आली आहे, असे अशी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी कळविले आहे.